Akshata Chhatre
नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत साखर हा आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे, पण आरोग्यासाठी ती अजिबात चांगली नाही. केवळ दोन आठवड्यांसाठी साखर सोडल्यास तुमच्या आरोग्यात मोठे सकारात्मक बदल दिसून येतील.
साखर अचानक सोडल्यास शरीरात काही प्रतिक्रिया येतात.डोकेदुखी, थकवा, चिडचिडेपणा आणि गोड खाण्याची तीव्र इच्छा होऊ शकते. याला "विड्रॉव्हल सिंड्रोम" म्हणतात. घाबरू नका, हा टप्पा लवकरच जातो आणि शरीर नवीन सवयीशी जुळवून घेते.
तुम्हाला तुमच्या ऊर्जा पातळीत बदल जाणवेल. जी ऊर्जा आधी कमी-जास्त होत होती, ती आता अधिक स्थिर होईल. साखर न खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते, ज्यामुळे दिवसभर एकसमान ऊर्जा टिकून राहते. दुपारची सुस्ती जाणवणार नाही.
शरीरात सर्वात पहिला आणि स्पष्ट बदल तुमच्या त्वचेत दिसेल. साखर शरीरातील सूज वाढवते आणि मुरुमे यांसारख्या समस्यांसाठी जबाबदार असते. साखर सोडल्यास तुमची त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते.
तुमचे वजन कमी होण्यास सुरुवात होऊ शकते. साखर म्हणजे 'रिकाम्या कॅलरी' जी पोषण न देता फक्त कॅलरी देते. साखर कमी केल्यास आपोआप कॅलरी सेवन कमी होते.
साखर आतड्यांमध्ये हानिकारक बॅक्टेरिया आणि यीस्टला प्रोत्साहन देते. साखर सोडल्यास आतड्यांचे मायक्रोबायोम आरोग्यदायी होते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि सूज कमी होते.
साखर सोडल्यास तुमच्या मेंदूचे आरोग्य सुधारते. 'ब्रेन फॉग'ची समस्या दूर होते, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते आणि मनःस्थिती चांगली राहते. तसेच, चिंता कमी होण्यास मदत होते.