Manish Jadhav
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात वसलेला पारगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या दक्षिण सीमांच्या रक्षणासाठी उभारला होता. हा किल्ला गोवा आणि कोकण किनारपट्टीवर लक्ष ठेवण्यासाठी अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे.
असे म्हटले जाते की, महाराजांनी या किल्ल्यावरील मावळ्यांना 'जोपर्यंत चंद्र-सूर्य आहे, तोपर्यंत हा किल्ला लढवत राहा' अशी आज्ञा दिली होती. आजही या किल्ल्यावरील रहिवासी स्वतःला शिवरायांचे वंशज आणि गडाचे रक्षक मानतात.
पारगड हा महाराष्ट्रातील अशा मोजक्या किल्ल्यांपैकी एक आहे, जिथे आजही लोकवस्ती आहे. गडावर सुमारे 70 ते 80 कुटुंबे राहतात, जी पिढ्यानपिढ्या गडाची निगा राखत आहेत.
गडावर भवानी मातेचे अतिशय सुंदर मंदिर आहे. या मंदिरात असलेली देवीची मूर्ती ही प्रतापगडावरील भवानी मातेच्या मूर्तीशी साधर्म्य दर्शवते. दरवर्षी येथे मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा केला जातो.
पारगड किल्ला तिन्ही बाजूंनी खोल दरीने वेढलेला आहे. पावसाळ्यात या गडाचे सौंदर्य अधिकच खुलते. गडावरुन दिसणारे तिलारी घाटाचे दृश्य आणि धबधबे पर्यटकांना भुरळ घालतात.
गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक देखणा पुतळा असून, गडाच्या प्रवेशद्वाराजवळच हनुमानाचे मंदिर आहे.
ऐतिहासिक महत्त्व आणि कठीण चढाईमुळे ट्रेकर्समध्ये पारगड अतिशय लोकप्रिय आहे. कोल्हापूरपासून साधारण 120 किमी अंतरावर असलेला हा किल्ला गडप्रेमींसाठी एक उत्तम ठिकाण आहे.
गडावरील प्रत्येक कोपऱ्यात इतिहासाच्या खुणा आजही जपलेल्या दिसतात.