Sameer Amunekar
मुलं सतत तुलना, स्पर्धा आणि अपयशाच्या भीतीत जगतात. सतत “फर्स्ट ये, टॉप कर” अशा अपेक्षांमुळे त्यांना स्वतःवरचा विश्वास कमी वाटतो. चुका केल्यावर शिक्षण न देता फक्त शिक्षा केली जाते, याचा परिणाम आत्मविश्वासावर होतो.
जर घरात वाद, अस्थिरता, सतत रागावलेलं वातावरण असेल तर मुलं असुरक्षित वाटतात. आई-वडिलांनी सतत तुलनाच केली (म्हणजे "पाहा, शेजारचा अमुक बघ किती हुशार आहे") तर मुलं स्वतःला कमी समजू लागतात.
मित्रांमधून होणारी थट्टा, बॉडी शेमिंग, किंवा बोलण्यावरून होणारी खिल्ली आत्मविश्वास कमी करतं. शिक्षक जर अपमानजनक शब्द वापरत असतील तर मुलं शाळेला घाबरतात आणि आत्मविश्वास गमावतात.
समाजातील “परिपूर्णतेची” व्याख्या (उदा. हुशार असणं, दिसणं, बोलणं) जर मुलांवर लादली गेली, तर ती आपल्याला “पुरेसं नाही” असं मानतात. सोशल मीडियावरची तुलना हेसुद्धा एक कारण आहे — “सगळे माझ्यापेक्षा चांगले आहेत” असं वाटू लागतं.
अपयश म्हणजे "संपलंच" असं शिकवलं जातं, त्यामुळे नवीन गोष्टी करायला भीती वाटते. "तू हे करू शकत नाहीस" असं वारंवार ऐकवलं तर तेच सत्य वाटू लागतं.
मुलांचा आत्मविश्वास कमी होण्यामागे एकचं कारण नसतं. अनेक गोष्टींमुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होत असतो.