Sameer Amunekar
मुलं आपल्या भावना आणि अनुभव सर्वांशी शेअर करत नाहीत, विशेषतः पालकांशी. काही गोष्टी त्या स्वतःमध्येच ठेवतात, कधी लाजेखातर, कधी भीतीमुळे, तर कधी त्यांना समजत नाही की याबद्दल बोलावं की नाही.
पालक म्हणून तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की, काही विशिष्ट गोष्टी मुलं सहज शेअर करत नाहीत.
मुलं शाळेत किंवा मित्रांशी काय बोलतात, काय शेअर करतात, याबद्दल पालकांना सांगत नाहीत. त्यांना वाटतं की पालक त्यांच्या मित्रांबद्दल प्रश्न विचारतील किंवा त्यांच्यावर बंधनं घालतील.
छळ किंवा सोशल मीडियावर मिळणाऱ्या अपमानास्पद कमेंट्सबद्दल मुलं फारसं बोलत नाहीत. त्यांना भीती वाटते की पालक रागावतील, जबरदस्ती फोन वापरणं बंद करतील किंवा शिक्षकांपर्यंत ही बाब पोहोचवतील.
मुलांना बऱ्याच वेळा परीक्षा, भविष्यातील टेन्शन, मैत्रीतील समस्या किंवा समाजाच्या अपेक्षा यामुळे भीती वाटत असते. मात्र, ते पालकांशी बोलत नाहीत कारण त्यांना वाटतं की 'पालक समजून घेणार नाहीत.
कधी कधी पालक काहीतरी बोलून नकळतपणे मुलांना दुखावतात. पण मुलं ही गोष्ट पालकांना सांगत नाहीत. त्यांना वाटतं की ‘आपण बोललो तर अजून मोठा वाद होईल’ किंवा ‘पालकांना माझ्या भावना समजणार नाहीत’. म्हणूनच, पालकांनी मुलांशी मोकळेपणाने संवाद साधावा.