Manish Jadhav
पन्हाळा किल्ला महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे. याचे बांधकाम 12व्या शतकात शिलाहार घराण्याने केले होते, परंतु तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अधिक प्रसिद्धीस आला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर सर्वाधिक काळ, म्हणजे 500 हून अधिक दिवस वास्तव्य केले होते. स्वराज्याच्या अनेक महत्त्वाच्या योजना याच किल्ल्यावरुन आखल्या गेल्या होत्या.
1660 मध्ये सिद्दी जौहरच्या वेढ्यातून शिवाजी महाराजांनी याच किल्ल्यावरुन सुटका केली. या वेढ्यातून बाहेर पडताना बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंडीत दिलेले बलिदान हे मराठा इतिहासातील एक अविस्मरणीय पर्व आहे, ज्याची सुरुवात पन्हाळ्यापासून झाली.
हा किल्ला सुमारे 7 किलोमीटरच्या घेऱ्यात पसरलेला आहे आणि त्याची रचना त्रिकोणी आहे. यात 360 मीटर लांबीचा एक भुयारी मार्ग आहे, जो शत्रूंपासून बचावासाठी किंवा गुप्त हालचालींसाठी वापरला जात असे.
पन्हाळा किल्ल्यावर अनेक ऐतिहासिक वास्तू आणि कलात्मक अवशेष आजही पाहायला मिळतात. यात सज्जा कोठी, अंबरखाना (धान्य कोठार), रेडे महाल आणि धर्मकोठी यांचा समावेश आहे.
किल्ल्याला तीन प्रमुख दरवाजे आहेत. वाघ दरवाजा, चार दरवाजा आणि तीन दरवाजा. यापैकी 'तीन दरवाजा' हा किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार मानला जातो.
किल्ल्यावरील सज्जा कोठी ही एक महत्त्वपूर्ण वास्तू आहे. याच ठिकाणाहून शिवाजी महाराजांनी सिद्दी जौहरच्या वेढ्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता असे मानले जाते.
आज पन्हाळा किल्ला एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे. इतिहासप्रेमी आणि निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने या किल्ल्याला भेट देतात.