Manish Jadhav
पालगड किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात आहे. खेड आणि दापोली या दोन तालुक्यांच्या सीमेवर पालगड नावाच्या गावातील उंच डोंगरावर हा किल्ला वसलेला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण किनारपट्टीवर स्वराज्याची पकड मजबूत करण्यासाठी अनेक किल्ले बांधले किंवा जिंकले. पालगड हा त्याच रणनीतीचा एक भाग असून कोकण प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी महाराजांनी या किल्ल्याचा उपयोग केला.
असे मानले जाते की, छत्रपती शिवाजी महाराजांनी 1670 च्या सुमारास जंजिऱ्याच्या सिद्दीला शह देण्यासाठी आणि स्वराज्याच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी पालगड किल्ल्याचे महत्त्व ओळखले होते.
पालगड किल्ला उंचीवर असल्याने येथून संपूर्ण दापोली आणि खेड परिसरावर नजर ठेवता येत असे. शत्रूच्या हालचाली टिपण्यासाठी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा टेहळणीसाठी प्रभावी वापर केला जात असे.
गडाची चहुबाजूंनी असलेली नैसर्गिक तटबंदी आणि गर्द झाडीचा परिसर गनिमी काव्यासाठी पूरक होता. महाराजांच्या शिलेदारांनी या किल्ल्याचा वापर करुन सिद्दीच्या आक्रमणांना अनेकदा रोखले.
पालगड हे साने गुरुजींचे जन्मगाव म्हणून ओळखले जाते. याच गावातील डोंगरावर असलेला हा किल्ला शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देत आजही उभा आहे, ज्यामुळे या गावाला एक वेगळी ऐतिहासिक ओळख मिळाली आहे.
किल्ल्यावर पालैय्या देवीचे प्राचीन मंदिर आहे. शिवकाळात गड बांधताना किंवा जिंकताना त्या गडावरील कुलदैवतांची पूजा करण्याची परंपरा होती, जी आजही पालगडवर जपली जाते.
महाराजांनी प्रत्येक किल्ल्यावर पाण्याची उत्तम सोय केली होती. पालगडवरही पाण्याची टाकी आणि विहिरी पाहायला मिळतात, जे शिवकालीन जलव्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण आहे.