Manish Jadhav
पाकिस्तान सध्या गंभीर अशा आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यातच, पाकव्याप्त काश्मीरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे.
पीओकेमधील जनता पाकिस्तान सरकारविरोधात रस्त्यावर उतरली आहे. पीओकेमध्ये तीन दिवसांपासून हिंसक निदर्शने सुरु आहेत. सध्या तरी ते शांत होण्याची चिन्हे नाहीत.
जम्मू-काश्मीर जॉइंट अवामी ॲक्शन कमिटी (JAAC) च्या बॅनरखाली पीओकेमध्ये हे आंदोलन सुरु आहे. मीरपूरचे एसएसएपी कामरान अली यांनी 'डॉन'ला सांगितले की, हिंसक आंदोलनात एसआय अदनान कुरेशीचा मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानातील 20% वीज PoK मधील मंगला धरणातून निर्माण होते. असे असूनही, PoK ला फक्त 30% वीज मिळते. त्याचा मोठा फायदा पाकिस्तानच्या पंजाब प्रांताला मिळतो.
PoK मधील पायाभूत सुविधाही कमकुवत आहेत. 70 वर्षांत ना रस्ते, ना पूल, ना शाळा, ना रुग्णालये आहेत. पीओकेमध्ये ज्या काही पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातात, त्याचा वापर पाकिस्तानी लष्कर करत असल्याचे म्हटले जाते.
जरी संपूर्ण पाकिस्तानात चलनवाढ होत असली तरी त्याचा प्रभाव PoK मध्ये अधिक दिसून येतो. येथील जनतेला सरकारकडून कोणताही दिलासा मिळत नसल्याचा दावा केला जात आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दरही गगनाला भिडले आहेत.
पाकिस्तानसाठी पीओके हा फक्त जमिनीचा एक तुकडा आहे, जिथून ते भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले करतात. नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असूनही पीओकेला त्याचा योग्य वाटा मिळत नाही.
पाकिस्तान पीओकेला ‘आझाद काश्मीर’ म्हणतो. त्याचे स्वतःचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती देखील आहेत. चौधरी अन्वारुल हक येथे पंतप्रधान आहेत. पीओकेमध्ये 53 जागा असलेली विधानसभा आहे.