Manish Jadhav
भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांनी जिओ लॉन्च केल्यानंतर टेलिकॉम विश्वात खळबळ उडाली होती. त्यामुळे अनेक दूरसंचार कंपन्या मार्केटमधून सपशेल बाहेर फेकल्या गेल्या होत्या. भारती मित्तल यांच्या एअरटेललाही या संकटातून जावे लागले होते.
सुनील भारती मित्तल यांच्या एअरटेललाही या संकटातून जावे लागले. पण मित्तल यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतची भेट त्यांच्यासाठी गेम चेंजर ठरली. हे आम्ही नाही तर खुद्द सुनील भारती मित्तल सांगितले आहे.
मार्केटमधील जिओच्या आगमनानंतर जेव्हा मित्तल यांची कंपनी अडचणीत आली तेव्हा पंतप्रधान मोदींच्या एका सल्ल्याने त्यांचे आयुष्यच पालटले.
मित्तल यांनी एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, सप्टेंबर 2018 मध्ये त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेली बैठक त्यावेळी संकटाचा सामना करणाऱ्या भारती एअरटेलसाठी एक टर्निंग पॉइंट ठरली.
मित्तल म्हणाले की, ‘’... (सप्टेंबर) 2018 मध्ये, मी पंतप्रधानांना भेटण्यासाठी भेटीची वेळ मागितली. मी तेव्हा GSMA चा अध्यक्ष होतो आणि नुकताच इंटरनॅशनल चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदावरुन मुक्त झालो होतो, तेव्हा मी त्यांना (PM) WTO, G20 आणि इतर मुद्द्यांवर माहिती देत होतो.’’
मोदींसोबतच्या भेटीची आठवण करुन देताना मित्तल म्हणाले की, ’’मी मार्केटमध्ये लढू शकतो, पण सरकारशी लढू शकत नाही. त्यावर त्यांनी मला सांगितले की, हे सरकार कोणत्याही एका बाजूला झुकणार नाही. देशासाठी जे चांगले होईल ते केले जाईल.’’
मित्तल यांनी सांगितले की, मोदी म्हणाले होते की, सरकारच्या बाजूने तुम्ही निश्चिंत राहू शकता. सरकार कोणा एकाची बाजू घेणार नाही. आणि ते माझ्यासाठी पुरेसे होते. त्यानंतर मी उठलो आणि त्यांचे आभार मानून निघालो... हा एक टर्निंग पॉइंट होता (एअरटेलसाठी).'
2019 मध्ये एअरटेलचे मार्केट कॅप सुमारे $19 अब्ज होते, जे व्यवसायात गुंतवलेल्या रकमेपेक्षा कमी होते. परंतु कंपनीने गेल्या पाच वर्षांत आपल्या मार्केट कॅपमध्ये $80 अब्जाहून अधिकची भर घातली आहे.