Manish Jadhav
पर्थमध्ये पदार्पण आणि आता मेलबर्नमध्ये ऐतिहासिक शतक. टीम इंडियाचा धाकड फलंदाज नितीश कुमार रेड्डीने दोन मोठी स्वप्ने जवळपास 35 दिवसांत पूर्ण केली.
टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याचे त्याचे पहिले स्वप्न पूर्ण झाले. तर आता कारकिर्दीतील पहिले शतक झळकावून त्यानं आपलं नाणं ठणकावून दाखवलं.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी नितीशने पहिल्या डावात उत्कृष्ट शतक झळकावून टीम इंडियाला फॉलोऑनच्या गर्तेतून बाहेर काढलं.
दिवसाचा खेळ संपेपर्यंत नितीश कुमार रेड्डी नाबाद 105 धावांवर खेळत होता. ESPNcricinfo नुसार, नितीशने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर 8 व्या क्रमांकावर किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करुन मोठ्या इनिंगचा विक्रम मोडला. यापूर्वी, 1902 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या रेगी डफने 10व्या क्रमांकावर 104 धावांची इनिंग खेळली होती.
ऑस्ट्रेलियात 8 व्या क्रमांकावर किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना शतक झळकावणारा नितीश हा पहिला भारतीय फलंदाज ठरला. याआधी भारतासाठी सर्वाधिक धावा 87 धावा होत्या, ज्या 2008 मध्ये ॲडलेड येथे अनिल कुंबळेने केल्या होत्या.
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावणारा रेड्डी हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. त्याच्या आधी महान अष्टपैलू खेळाडू विनू मंकडने 1948 मध्ये हा पराक्रम केला होता.