Sameer Amunekar
महाराष्ट्रातील बहुतांश किल्ले सह्याद्रीच्या रांगांमध्ये आहेत, परंतु नरनाळा हा सातपुड्याच्या पर्वतरांगांमधील सर्वात अभेद्य आणि देखणा किल्ला मानला जातो. अकोला जिल्ह्यातील अकोट जवळ असलेला हा किल्ला निसर्ग आणि इतिहासाचा एक सुंदर संगम आहे.
या किल्ल्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचा संबंध नागपूरकर भोसले राजघराण्याशी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासोबतच, विदर्भातील या किल्ल्याने नागपूरकर भोसल्यांच्या पराक्रमाचा काळ जवळून अनुभवला आहे.
नरनाळा किल्ल्याचा इतिहास खूप मोठा आहे. याने बहामनी साम्राज्य, इमादशाही, निजामशाही, मोगल, नागपूरकर भोसले आणि शेवटी इंग्रजांची राजवट पाहिली आहे. या सर्व कालखंडांच्या खुणा आजही किल्ल्याच्या वास्तूंवर पाहायला मिळतात.
विदर्भातील दुर्गवैभवात सातपुड्यातील गाविलगड आणि नरनाळा या दोन किल्ल्यांना विशेष महत्त्व आहे. या दोन्ही किल्ल्यांचा इतिहास एकमेकांशी समांतर चालतो. संरक्षणाच्या दृष्टीने या दोन्ही किल्ल्यांचे स्थान अत्यंत मोक्याचे होते.
नरनाळा किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील महाकाली दरवाजा. पांढऱ्या पाषाणात कोरलेला हा दरवाजा मुघल स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना आहे. यावर असलेले कोरीव काम आणि शिलालेख पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.
किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचे अनेक तलाव आहेत, जे आजही भरलेले असतात. तसेच, येथील 'नऊ लाखी' तोफ पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. या तोफेची लांबी आणि तिचे वजन पाहून त्या काळातील लष्करी ताकदीची प्रचिती येते.
शहानूर गावापासून सुरू होणारा नरनाळा किल्ला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर येतो. त्यामुळे किल्ल्यावर फिरताना तुम्हाला केवळ इतिहासच नाही, तर घनदाट जंगल आणि समृद्ध जैवविविधता देखील पाहायला मिळते.