Manish Jadhav
धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वात भव्य आणि अफाट विस्तार असलेला भुईकोट किल्ला मानला जातो. सुमारे 84 एकर क्षेत्रात पसरलेला हा किल्ला लष्करी रणनीती आणि वास्तुकलेचा अद्भूत नमुना आहे.
नळदुर्ग किल्ल्याचा इतिहास पौराणिक काळाशी जोडला गेला आहे. असे मानले जाते की, हा किल्ला हिंदू राजा नल याने बांधला होता. प्रसिद्ध नल-दमयंतीची अमर प्रेमकथा याच किल्ल्याशी संबंधित असल्याचे स्थानिक लोककथांमध्ये सांगितले जाते.
14व्या शतकात हा किल्ला बहामनी राज्याचा भाग बनला. त्यानंतर विजापूरच्या आदिलशाही सल्तनतीने या किल्ल्याची पुनर्बांधणी करुन त्याला अत्यंत मजबूत तटबंदी आणि भक्कम बुरुज प्रदान केले.
नळदुर्ग किल्ला एका ऐतिहासिक आणि राजकीय विवाहाचा साक्षीदार राहिला आहे. विजापूरचे सुलतान अली आदिलशाह आणि अहमदनगरची प्रसिद्ध राजकन्या चांदबीबी यांचा भव्य विवाह सोहळा याच नळदुर्ग किल्ल्यावर पार पडला होता.
या किल्ल्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे बोरी नदीवर बांधलेला महाल आणि धबधबा. पावसाळ्यात जेव्हा नदीला पूर येतो, तेव्हा या महालावरुन वाहणाऱ्या दोन धबधब्यांना 'नर' आणि 'मादी' असे म्हटले जाते. हा अभियांत्रिकीचा एक मध्ययुगीन चमत्कार आहे.
नळदुर्ग किल्ल्यातील 'उपली बुरुज' हा सर्वात उंच बुरुज मानला जातो. या बुरुजावरुन शत्रूच्या हालचालींवर दूरवरुन लक्ष ठेवले जात असे. किल्ल्यावर आजही मध्ययुगीन काळातील अत्यंत भव्य आणि वजनदार तोफा सुस्थितीत पाहायला मिळतात.
इतिहासाच्या विविध टप्प्यांवर या किल्ल्यावर मराठे, मुघल आणि हैदराबादच्या निजामशाहीचे वर्चस्व राहिले. पेशव्यांच्या काळातही या किल्ल्याला विशेष राजकीय महत्त्व होते आणि शेवटी तो हैदराबाद राज्याचा भाग बनला होता.