Manish Jadhav
म्हैसूर पॅलेस हा कर्नाटकातील म्हैसूर शहरात स्थित असून तो कर्नाटकातील सर्वात महत्त्वाच्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे. ताजमहाल नंतर भारतात सर्वाधिक पर्यटक या पॅलेसला भेट देतात.
या भव्य वाड्याची बांधणी 'इंडो-सारासेनिक' शैलीत केली गेली, ज्यामध्ये हिंदू, मुस्लिम, राजपूत आणि गॉथिक वास्तुकलेचे सुंदर मिश्रण पाहायला मिळते. याचे डिझाइन ब्रिटिश वास्तुविशारद हेन्री इर्विन यांनी केले होते.
हा राजवाडा वोडेयार (Wodeyar) राजघराण्याचे अधिकृत निवासस्थान आहे. मूळ लाकडी राजवाडा 1897 मध्ये एका आगीत जळून खाक झाला होता, त्यानंतर सध्याचा हा नवा दगडी राजवाडा 1912 मध्ये पूर्ण झाला.
राजवाड्याच्या आतील भागात 'कल्याण मंडप' (लग्नाचा मंडप) आणि 'पब्लिक दरबार हॉल' पाहण्यासारखे आहेत. येथील कोरीव काम, रंगीत काचा आणि छतावरील डिझाइन पाहून डोळ्यांचे पारणे फिटते.
म्हैसूर पॅलेसची खरी शोभा रात्रीच्या वेळी दिसते. दर रविवारी आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी संध्याकाळी 97000 हून अधिक दिव्यांनी हा राजवाडा उजळून निघतो, जे दृश्य अत्यंत मंत्रमुग्ध करणारे असते.
म्हैसूरचा जगप्रसिद्ध दसरा उत्सव या राजवाड्याच्या परिसरात साजरा केला जातो. या काळात राजवाडा सोन्यासारखा चमकतो आणि हत्तींची भव्य मिरवणूक हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते.
राजवाड्याच्या आत एक मोठे संग्रहालय आहे, जिथे राजघराण्याने वापरलेली 700 हून अधिक शस्त्रे, चित्रे आणि राजेशाही पोशाख जतन करुन ठेवले आहेत.
म्हैसूर हे शहर बंगळुरुपासून साधारण 140 किमी अंतरावर आहे. रस्ते आणि रेल्वे मार्गाने म्हैसूर पॅलेसला पोहोचणे अत्यंत सोपे आहे. बंगळुरु विमानतळावरुन तुम्ही खाजगी वाहनानेही इथे येऊ शकता.