Sameer Amunekar
२७ ऑगस्ट २०२५ रोजी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चाकरमानी आपल्या गावाकडे निघतात.
नेहमीच्याच रेल्वे आणि रस्ते मार्गाव्यतिरिक्त यावर्षी चाकरमान्यांना समुद्रमार्गे प्रवास करण्याचा एक नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे.
राज्य सरकारने कोकणवासीयांसाठी दिलासादायक घोषणा केली आहे. भाजप नेते आणि राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना माहिती दिली.
मंत्री राणे म्हणाले, "गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना लवकरच सागरी प्रवासाचा पर्याय खुला होणार आहे. मुंबई ते रत्नागिरी आणि मुंबई ते सिंधुदुर्गदरम्यान एम टू एम फेरी सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे."
या फेरी सेवेच्या माध्यमातून एकावेळी ५०० प्रवासी आणि १५० वाहने वाहून नेण्याची सुविधा असणार आहे. यामुळे चाकरमान्यांना वाहतुकीसाठी एक वेगळा आणि सुलभ मार्ग उपलब्ध होणार आहे.
मुंबई ते विजयदुर्ग फक्त ४.५ तासांत आणि मुंबई ते रत्नागिरी अवघ्या ३ तासांत प्रवास करता येणार असल्याचेही राणे यांनी स्पष्ट केले.
कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही फेरी सेवा मोठा दिलासा ठरणार असून, प्रवासाचा ताण आणि वेळ वाचणार आहे.