Ashutosh Masgaunde
'कॅश फॉर क्वेरी' प्रकरणी महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आली. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मोईत्रा यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला, त्याला सभागृहाने मंजुरी दिली.
संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात महुआ मोईत्रा यांनी व्यापारी दर्शन हिरानंदानी यांच्याकडून महागड्या भेटवस्तू घेतल्याचे नीतिशास्त्र समितीने अहवालात लिहिले आहे.
उद्योगपतीकडून या भेटवस्तू आणि रोख रकमेच्या बदल्यात महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल प्रश्न विचारले होते.
एका व्यावसायिकाकडून भेटवस्तू घेणे आणि त्याला तुमचे संसदेतील लॉग-इन तपशील देणे चुकीचे आणि संसदीय आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे अहवालात म्हटले आहे.
याबाबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, महुआ मोईत्रा यांचे खासदार म्हणून वर्तन अनैतिक आणि अयोग्य असल्याचे समितीचे निष्कर्ष सभागृहाने स्वीकारले. त्यामुळे त्यांनी खासदार म्हणून राहणे योग्य नाही.
खासदार म्हणून निलंबन झाल्यानंतर, महुआ मोईत्रा म्हणाल्या, "एथिक्स कमिटीला हकालपट्टी करण्याचा अधिकार नाही... ही तुमच्या (भाजप) शेवटाची सुरुवात आहे."
महुआ मोइत्रा यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहातून सभात्याग केला. त्याचवेळी लोकसभेचे कामकाज 11 डिसेंबर सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.