Pranali Kodre
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळणारे दोन संघ निश्चित झाले आहेत.
19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात अंतिम सामना रंगणार आहे.
ऑस्ट्रेलिया आठव्यांदा अंतिम सामना खेळताना दिसणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या नावावर सर्वाधिकवेळा वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळण्याचा विक्रमही आहे.
तसेच ऑस्ट्रेलियाने यापूर्वी 1975, 1987, 1996, 1999, 2003, 2007 आणि 2015 साली वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळला आहे. यातील 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 साली ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकला आहे.
तसेच ऑस्ट्रेलिया पाठोपाठ भारतीय संघ चौथ्यांदा वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळणार आहे. भारताने यापूर्वी 1983, 2003 आणि 2011 साली वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळला आहे, त्यातील 1983 आणि 2011 साली विजय मिळवला आहे.
इंग्लंडनेही चारवेळा अंतिम सामना खेळला आहे. त्यांनी 1979,1987, 1992 आणि 2019 साली वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळला असून 2019 साली विजेतेपद जिंकले आहे.
श्रीलंकेने 1996, 2007 आणि 2011 साली असे तीनवेळा वर्ल्डकपचे अंतिम सामने खेळले. यातील केवळ 1996 साली त्यांना विजय मिळवता आला.
वेस्ट इंडिजने 1975, 1979 आणि 1983 साली असे वर्ल्डकपचे तीनवेळ अंतिम सामने खेळले. यामध्ये त्यांना 1975 आणि 1979 साली विजेतेपद मिळवता आले होते.
पाकिस्तानने 1992 आणि 1999 सालच्या वर्ल्डकपमध्ये अंतिम सामना खेळला. यातील 1992 साली त्यांनी विजेतेपदाला गवसणी घातली, तर 1999 साली त्यांना पराभव स्विकारावा लागला.
न्यूझीलंडनेही 2015 आणि 2019 असे दोन वर्ल्डकपमध्ये अंतिम सामना खेळला, पण दोन्ही वेळेस त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.