दैनिक गोमन्तक डिजिटल
पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार, जुलाब आणि कावीळ यांसारखे आजार पसरतात. त्यामुळे मुलांना नेहमी १० ते १५ मिनिटे चांगले उकळून कोमट केलेले पाणीच पिण्यास द्या. बाहेर जाताना घरूनच पाण्याची बाटली सोबत ठेवा.
मुलांना पचायला हलका, ताजा आणि गरम आहार द्या. या दिवसांत रस्त्यावरील उघडे अन्न, जंक फूड आणि शीतपेये देणे पूर्णपणे टाळा. आहारात सूप, वरण-भात, मोड आलेली कडधान्ये आणि हंगामी फळांचा समावेश करा, ज्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती वाढेल.
पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव वाढतो. मुलांनी घराबाहेर खेळायला जाताना किंवा रात्री झोपताना पूर्ण बाह्यांचे कपडे घालावेत. घरात आणि घराभोवती कुठेही पाणी साचू देऊ नका आणि डासांपासून संरक्षणासाठी मॉस्किटो रिपेलेंट किंवा मच्छरदाणीचा वापर करा.
मुलांना बाहेरून आल्यावर, जेवणापूर्वी आणि शौचास जाऊन आल्यावर हात स्वच्छ धुण्याची सवय लावा. संसर्ग टाळण्यासाठी त्यांची नखे वेळोवेळी कापून स्वच्छ ठेवा. खेळून आल्यावर त्यांचे पाय अँटीसेप्टिक साबणाने स्वच्छ धुवावेत.
पावसात भिजल्यामुळे किंवा दमट वातावरणामुळे मुले जास्त वेळ ओल्या कपड्यांत राहिली, तर त्यांना सर्दी, खोकला किंवा न्यूमोनिया होऊ शकतो. मुले पावसात भिजल्यास त्यांना लगेच कोमट पाण्याने अंघोळ घालून त्यांचे शरीर आणि केस कोरडे करा व सुती (कॉटनचे) कपडे घाला.
दमट वातावरणामुळे लहान मुलांमध्ये फंगल इन्फेक्शन आणि घामोळ्यांची समस्या वाढते. त्यामुळे त्यांना सैल आणि सुती कपडे घाला. मुलांचे अंघोळीचे टॉवेल, अंथरूण आणि कपडे नेहमी कडक उन्हात किंवा जंतूनाशक द्रवाचा वापर करून स्वच्छ वाळवूनच वापरा.
घरात किंवा शेजारी कोणाला सर्दी, खोकला किंवा फ्लू झाला असल्यास मुलांना त्यांच्या संपर्कात येऊ देऊ नका. मुलांमध्ये ताप, जुलाब किंवा उलट्या अशी कोणतीही लक्षणे दिसल्यास स्वतःच्या मनाने औषधे न देता तात्काळ बालरोगतज्ज्ञांचा (Pediatrician) सल्ला घ्या.