Akshata Chhatre
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे केस गळणे, वाढ न होणे, कोंडा, कोरडेपणा अशा अनेक समस्या सामान्य झाल्या आहेत.
बाजारात मिळणाऱ्या रासायनिक उत्पादनांचा वापर केल्याने काही काळासाठी आराम मिळू शकतो, पण त्यांचा सातत्याने वापर केल्याने केस आणखी कमकुवत होतात.
नैसर्गिक घटकांच्या मदतीने केसांना मूलभूत पोषण मिळते आणि ते दीर्घकाळ निरोगी राहतात. अशाच एका सोप्या आणि प्रभावी घरगुती उपायाचा पर्याय म्हणजे मेथी आणि दह्याचा हेअर मास्क.
हा मास्क घरी सहज तयार करता येतो आणि तो केसांच्या अनेक समस्यांवर प्रभावी ठरतो.
मेथीमध्ये प्रोटीन, लोह आणि निकोटिनिक अॅसिड असतात, जे केसांच्या मुळांना पोषण देतात आणि केसांची वाढ वाढवतात. त्यातील अॅंटिफंगल आणि अॅंटीबॅक्टेरियल गुणधर्म डोक्याच्या त्वचेमधील कोंडा, खाज आणि सूज कमी करण्यात मदत करतात.
दुसरीकडे, दही नैसर्गिक कंडीशनरप्रमाणे काम करतं. त्यामध्ये असणारं लॅक्टिक अॅसिड डोक्याची त्वचा स्वच्छ करतं आणि केसांना आवश्यक ओलावा पुरवून त्यांना मऊ, लवचिक आणि चमकदार बनवतं.
मास्क तयार करण्यासाठी २ चमचे ताजं दही आणि १ चमचा बारीक केलेली मेथी घ्या. हे दोन्ही नीट मिसळून एकसंध पेस्ट तयार करा. हे मिश्रण केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत लावा आणि सुमारे ३०–४० मिनिटं तसेच ठेवा. नंतर कोमट पाण्याने आणि सौम्य शॅम्पूने केस धुवा.