Manish Jadhav
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने भारतात क्लाउड आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी तीन अब्ज डॉलर्स म्हणजेच 25,700 कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.
याशिवाय, कंपनी 2030 पर्यंत देशातील एक कोटी लोकांना AI चे प्रशिक्षणही देईल.
मंगळवारी (7 जानेवारी) यासंबंधीची घोषणा करताना मायक्रोसॉफ्टचे चेअरमन आणि सीईओ सत्य नडेला म्हणाले की, भारतात लोक आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापराला प्रोत्साहन देत आहेत.
नडेला म्हणाले की, भारतातील आमच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या विस्ताराची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे, ज्यामध्ये आम्ही आमच्या Azure क्षमतेचा विस्तार करण्यासाठी अतिरिक्त US $ 3 अब्ज गुंतवले आहेत.
मायक्रोसॉफ्ट त्याची क्लाउड कंप्युटिंग सेवा Azure या ब्रँड नावाखाली प्रदान करते. यात 60 हून अधिक Azure क्षेत्रे आहेत ज्यात 300 हून अधिक डेटा केंद्रांचा समावेश आहे.
फेब्रुवारी 2024 मध्ये जेव्हा नडेला यांनी भारताला शेवटचा दौरा केला तेव्हा त्यांनी घोषणा केली होती की, कंपनी 2025 पर्यंत देशातील 2 दशलक्ष लोकांना AI कौशल्याच्या संधी उपलब्ध करुन देईल.
मायक्रोसॉफ्टच्या अध्यक्षांनी सोमवारी (6 जानेवारी) नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. नडेला म्हणाले की, पंतप्रधानांनी एआय मिशन, इंडिया स्टॅक इत्यादींबाबत त्यांनी त्यांचे व्हिजन शेअर केले.