Manish Jadhav
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) इंटरनॅशनल लीग टी20 (आयएलटी20) आणि मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) मध्ये चॅम्पियन बनलेल्या मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने आता चौथ्या टी20 लीगमध्येही आपली यशोगाथा लिहिली आहे.
दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या टी-20 लीग SA20 मध्ये एमआय केपटाऊनने पहिल्यांदाच विजेतेपद जिंकून इतिहास रचला आहे.
राशीद खानच्या नेतृत्वाखालील एमआय केपटाऊनने SA20 च्या तिसऱ्या हंगामात अंतिम सामन्यात सलग दोन वेळा विजेता असलेल्या सनरायझर्स ईस्टर्न केपला 76 धावांनी पराभूत करुन विजेतेपद जिंकले. यामुळे, काव्या मारनच्या मालकीच्या सनरायझर्सचे सलग तिसऱ्यांदा विजेतेपद जिंकून हॅटट्रिक करण्याचे स्वप्नही भंगले.
शनिवारी संध्याकाळी, 8 फेब्रुवारी रोजी जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्याचा निकाल पूर्णपणे एकतर्फी होता आणि लीग स्टेजप्रमाणेच, केपटाऊनने या सामन्यातही आपले पूर्ण वर्चस्व राखले.
लीगच्या पहिल्या दोन हंगामात पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर राहिलेल्या केपटाऊनने यावेळी जोरदार पुनरागमन केले आणि संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. यावेळी, राशीदच्या नेतृत्वाखालील संघाने केवळ पॉइंट्स टेबलमध्ये पहिले स्थान पटकावले नाही तर पहिल्यांदाच अंतिम फेरीतही पोहोचला आणि नंतर अंतिम फेरीत त्यांनी दोन वेळा गतविजेत्या संघाला सहज पराभूत केले.
या अंतिम सामन्याच्या सुरुवातीपासूनच केपटाऊनने सनरायझर्सवर आपले वर्चस्व राखले. रायन रिकेल्टन आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांची वादळी खेळी एमआय केपटाऊनला विजयी करण्यात निर्णायक ठरली.