Manish Jadhav
जगातील सर्वात लोकप्रिय फुटबॉलपटू पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डोचा जन्म 5 फेब्रुवारी 1985 रोजी झाला. तर ब्राझीलचा स्टार नेमार देखील याच दिवशी एका गरीब कुटुंबात जन्मला.
रोनाल्डो आणि नेमार यांचे जगभर चाहते आहेत. फुटबॉल प्रेमी आज या दोन महान खेळांडूच्या वाढदिवसाचा आनंद साजरा करत आहेत.
रोनाल्डो आज दरवर्षी 1000 कोटी कमवतो. पण त्याचे बालपण एका पत्र्याच्या खोलीत गेले. त्याची आई दुसऱ्यांच्या घरी स्वयंपाकाचे काम करायची.
शाळेत असतानाच रोनाल्डोनं आपलं ध्येय निश्चित करत फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली. त्याला अभ्यासात रस नव्हता. त्याने वयाच्या आठव्या वर्षी स्थानिक फुटबॉल क्लबकडून खेळायला सुरुवात केली. नंतर त्याची 17 वर्षांखालील विश्वचषकासाठी निवड झाली.
रोनाल्डोप्रमाणेच नेमारचेही बालपण गरिबीत गेले. नेमारचे कुटुंब साओ पाउलोमधील मोगी दास क्रूझेस नावाच्या झोपडपट्टीत राहत होते. त्याचे वडील चांगले फुटबॉलपटू होते, पण घरची आर्थिक स्थिती चांगली नव्हती.
नेमारच्या वडिलांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कामे केली. गरिबीमुळे अनेक वेळा कुटुंबाला वीज बिल भरणेही शक्य नसायचे.
नेमारने पहिल्यांदा स्ट्रीट फुटबॉलर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. गरिबी असूनही, वडिलांनी आपल्या मुलाला फुटबॉलपटू बनवण्यात कोणत्याही प्रकारची कसर सोडली नाही. वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी नेमार ब्राझीलच्या प्रसिद्ध एफसी सॅंटोस क्लबमध्ये सामील झाला. यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही.
वयाच्या 17व्या वर्षी नेमारने एफसी सॅंटोससोबत त्याचा पहिला सीनियर कॉन्ट्रॅक्ट साइन केला. 2009 मध्ये नेमार ब्राझील अंडर-17 संघाचा कर्णधार होता. 2017 मध्ये नेमार जगातील सर्वात महागडा फुटबॉलपटू होता.
रोनाल्डो आणि नेमार यांच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरुन येतो की शुक्रवारी सकाळपासून त्यांच्या वाढदिवसापासून, #CristianoRonaldo ट्विटरवर ट्रेंड करत आहे. एका चाहत्याने लिहिले की, या पिढीतील सर्वोत्तम खेळाडूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा! हा सुंदर खेळ खेळत राहा आणि लाखो चाहत्यांना तुमच्या स्वप्नांनी प्रेरित करत राहा! तर दुसऱ्या चाहत्याने लिहिले की, आमच्याकडून तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. फुटबॉल प्रेमींना प्रेरित करत रहा.