Manish Jadhav
गोवा जसा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, तसाच तो इथल्या विविध धार्मिक उत्सवांसाठी देखील प्रसिद्ध आहे.
जांबावलीचा गुलालोत्सव, वास्कोचा दामोदर सप्ताह, शिरगावच्या लइराई देवीची जत्रा अशा प्रकारच्या उत्सवांनी भरलेल्या या गोव्यात एक विशिष्ट महत्व प्राप्त असलेली जत्रा भरते ती म्हणजे "मसणदेवीची जत्रा"
तळेवाडा-नार्वे येथील प्रसिद्ध मसणदेवीची जत्रा आज (20 ऑगस्ट) (मंगळवारी) पारंपरिक पद्धतीने मोठ्या भक्तीभावाने साजरी करण्यात आली. दरवर्षी श्रावण महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी ही जत्रा भरते. 'भूतांची देवी' म्हणून ही देवी प्रसिद्ध आहे.
ही देवी कौंडीण्य गोत्रातील लोकांची देवता मानली जाते.
मंदिराची खासियत म्हणजे इथे असलेले काजऱ्याचे झाड. इच्छापूर्ती न झालेल्या अतृप्त आत्म्यांना इथे मुक्ती दिली जाते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
प्रत्येक देवी-देवतांप्रमाणे या देवीचे वाहन म्हणून मंदिरात वाघाची ज्याला वाघऱ्याची प्रतिमा असे म्हणतात ती देवीच्या गाभाऱ्याच्या समोर स्थापन केलेली आहे. असे म्हटले जाते की, सूर्यास्तानंतर या परिसरात देवी वाघावरुन फेरी मारते.