Manish Jadhav
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात वसलेले मार्लेश्वर हे ठिकाण पावसाळ्यात स्वर्गासारखे भासते. सह्याद्रीच्या उंचच उंच कड्यांमधून कोसळणारा धबधबा आणि सभोवतालची हिरवीगार वनराई पर्यटकांना मंत्रमुग्ध करते.
मार्लेश्वर गुहेच्या अगदी जवळून कोसळणाऱ्या या विहंगम धबधब्याला 'धारेश्वर धबधबा' म्हणून ओळखले जाते. पावसाळ्यात या धबधब्याचा वेग आणि पांढराशुभ्र प्रवाह पाहणे हा एक अत्यंत थरारक आणि नयनरम्य अनुभव असतो.
मार्लेश्वर हे केवळ पर्यटन स्थळ नसून एक जागृत देवस्थान आहे. एका नैसर्गिक आणि रहस्यमयी गुहेमध्ये भगवान शिवशंकरांचे स्वयंभू लिंग आहे. पावसाळ्यात गुहेच्या आजूबाजूने वाहणारे पाण्याचे झरे येथील वातावरणात एक वेगळीच पवित्रता निर्माण करतात.
ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी मार्लेश्वर हे पावसाळ्यात उत्तम ठिकाण आहे. मुख्य मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी साधारण 250 ते 300 पायऱ्या चढाव्या लागतात. पायऱ्या चढताना आजूबाजूला दिसणारी धुक्याची चादर आणि पावसाच्या सरी ट्रेकिंगचा आनंद द्विगुणित करतात.
पावसाळ्यात मार्लेश्वर परिसरात इतके दाट धुके असते की, काही अंतरावरचेही दिसत नाही. धुक्यामध्ये हरवून गेलेले डोंगर, थंडगार वाहणारे वारे आणि रिमझिम पाऊस यामुळे येथे शहरांमधील गजबजाटापासून दूर मनःशांती मिळते.
जर तुम्हाला निसर्गाचे सुंदर फोटो कॅमेऱ्यात कैद करायचे असतील, तर पावसाळ्यातील मार्लेश्वर तुम्हाला सर्वोत्तम फ्रेम्स देईल. डोंगरावरुन वाहणारे छोटे-मोठे पाण्याचे झरे, हिरवेगार निसर्गपट आणि ढगांनी वेढलेले डोंगर फोटोग्राफीसाठी उत्तम बॅकड्रॉप ठरतात.
रत्नागिरी शहरापासून मार्लेश्वर साधारण 60 ते 70 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई-गोवा महामार्गावरुन देवरुखमार्गे येथे सहज पोहोचता येते. जवळचे रेल्वे स्टेशन 'संगमेश्वर' असून तिथून खाजगी वाहने किंवा एसटी बसने मार्लेश्वरला जाता येते.