Manish Jadhav
मांडूचा किल्ला विंध्य पर्वताच्या रांगांमध्ये, समुद्रसपाटीपासून तब्बल 2000 फूट उंचावर एका विशाल खडकावर बांधला गेला आहे. याच्या अद्भूत सौंदर्यामुळे आणि आल्हाददायक वातावरणामुळे या किल्ल्याला 'शादियाबाद' म्हणजेच 'सिटी ऑफ जॉय' असे म्हटले जायचे.
मांडूचा इतिहास मालवाचा शेवटचा सुलतान बाझ बहादूर आणि त्याची रुपवान हिंदू राणी रुपमती यांच्या निस्सीम प्रेमकथेशिवाय अपूर्ण आहे. किल्ल्यातील 'रुपमती पॅव्हेलियन' हे राणीने नर्मदा नदीच्या दर्शनासाठी आणि बाझ बहादूरच्या प्रेमाची आठवण म्हणून बांधले होते.
या किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी तब्बल 45 किलोमीटर लांबीची मजबूत तटबंदी बांधण्यात आली आहे. या तटबंदीमध्ये 12 मुख्य प्रवेशद्वार आहेत, ज्यामध्ये 'दिल्ली दरवाजा', 'जहांगीर दरवाजा' आणि 'तारापूर दरवाजा' हे आपल्या अवाढव्य रचनेसाठी आणि युद्धाच्या थरारक इतिहासासाठी प्रसिद्ध आहेत.
मांडू किल्ल्यातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे 'जहाज महाल'. दोन कृत्रिम तलावांच्यामध्ये बांधलेली ही वास्तू पाण्यावर तरंगणाऱ्या एखाद्या विशाल जहाजासारखी दिसते. हा महाल सुलतान गियासुद्दीन खिलजी याने आपल्या शाही जनानखान्यासाठी बांधला होता.
किल्ल्याच्या आवारात असलेला सुलतान होशंग शाह यांचा मकबरा हा भारतातील पहिली पूर्णपणे संगमरवरी दगडात बांधलेली वास्तू आहे. या वास्तूचे सौंदर्य पाहूनच पुढे मुघल सम्राट शहाजहानने ताजमहाल बांधण्याची प्रेरणा घेतली होती.
मांडूच्या किल्ल्याने अनेक शतके अफगाण आणि मुघल साम्राज्यामधील रक्तरंजित संघर्ष अनुभवला आहे. मुघल सम्राट अकबरने जेव्हा मांडूवर चढाई केली, तेव्हा बाझ बहादूरला पळून जावे लागले आणि राणी रुपमतीने अकबराच्या हाती लागण्याऐवजी विष प्राशन करुन स्वतःचे आयुष्य संपवले.
मांडू किल्ल्याच्या परिसरात आफ्रिकेत आढळणारी वैशिष्ट्यपूर्ण 'बाओबाब' झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात, जी अफगाण व्यापारी आणि सैनिकांनी तिथे आणली होती. हा किल्ला अफगाण स्थापत्यकलेचा भारतातील सर्वात उत्कृष्ट आणि जिवंत नमुना मानला जातो.