Manish Jadhav
खर्डा किल्ला हा इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण याच ठिकाणी 1795 मध्ये झालेल्या युद्धात मराठ्यांनी हैदराबादच्या निजामाचा निर्णायक पराभव केला होता. मराठा साम्राज्याच्या एकजुटीचे हे शेवटचे मोठे युद्ध होते.
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात असलेला हा किल्ला 'भुईकोट' प्रकारचा आहे. सभोवताली सपाट प्रदेश असूनही या किल्ल्याची रचना संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत मजबूत करण्यात आली होती.
या युद्धाच्या वेळी सवाई माधवराव पेशवे गादीवर होते आणि नाना फडणवीस यांच्या मुत्सद्देगिरीमुळे सर्व मराठा सरदार (शिंदे, होळकर, गायकवाड, भोसले, पटवर्धन) या मोहिमेसाठी एकत्र आले होते.
खर्डा किल्ल्याला दुहेरी तटबंदी असून ती आजही सुस्थितीत आहे. किल्ल्याचे बुरुज आणि तटबंदीवर असणाऱ्या जंग्या (बंदुकीसाठी छिद्रे) त्या काळातील प्रगत युद्धतंत्राची साक्ष देतात.
किल्ल्याला एक भव्य प्रवेशद्वार आहे. आत गेल्यावर आपल्याला सदर (कचेरी), पाण्याचे टाके आणि कोठारांचे अवशेष पाहायला मिळतात. निंबाळकर घराण्याने या किल्ल्याचे बांधकाम केल्याचे मानले जाते.
खर्डाच्या युद्धात मराठ्यांच्या अफाट सैन्यापुढे निजामाचा निभाव लागला नाही. त्याला आपला जीव वाचवण्यासाठी मराठ्यांच्या सर्व अटी मान्य कराव्या लागल्या आणि मोठा प्रदेश व दंड द्यावा लागला.
पानिपतच्या पराभवानंतर मराठ्यांनी पुन्हा एकदा आपली शक्ती या किल्ल्याच्या निमित्ताने जगाला दाखवून दिली होती. सर्व मराठा सत्ताधीशांनी एकाच भगव्या ध्वजाखाली लढलेले हे शेवटचे युद्ध ठरले.
आज हा किल्ला पुरातत्व विभागाच्या संरक्षणाखाली आहे. किल्ल्याच्या बुरुजावरुन आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य दिसते. इतिहासप्रेमी आणि दुर्गप्रेमींसाठी हे एक उत्तम पर्यटन स्थळ आहे.
खर्डा गाव या किल्ल्यामुळेच ओळखले जाते. किल्ल्याच्या जवळील 'कानिफनाथ गड' देखील प्रसिद्ध आहे. ग्रामीण भागातील हा ऐतिहासिक ठेवा महाराष्ट्राच्या शौर्याची आठवण करुन देतो.