Manish Jadhav
पाकिस्तानच्या भूमीवर खेळल्या जात असलेल्या तिरंगी एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडने उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.
तिरंगी एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर, केन विल्यमसनच्या शानदार शतकाच्या बळावर न्यूझीलंडने दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने तिरंगी एकदिवसीय मालिकेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.
न्यूझीलंडच्या शानदार विजयात केन विल्यमसनची नाबाद शतकी खेळी महत्वाची ठरली. केनने 133 धावांची नाबाद खेळी केली, ज्यामध्ये त्याने 13 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार मारले.
त्याने या शतकासह एकदिवसीय क्रिकेटमध्ये 7000 धावाही पूर्ण केल्या. शिवाय, त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक मोठा रेकॉर्डही केला.
या सामन्यापूर्वी, केन विल्यमसनला एकदिवसीय सामन्यात 7000 धावा पूर्ण करण्यासाठी 132 धावांची आवश्यकता होती. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 133 धावांची नाबाद खेळी खेळून त्याने मोठे यश मिळवले. त्याने त्याच्या 167 व्या एकदिवसीय सामन्यातील 159 व्या डावात 7000 एकदिवसीय धावांचा टप्पा गाठला. अशाप्रकारे त्याने विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स सारख्या दिग्गजांना एकाच झटक्यात मागे सोडले.
खरं तर, केन एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद 7 हजार धावा करणारा जगातील दुसरा फलंदाज बनला. एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद 7000 धावा करण्याच्या बाबतीत त्याने विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स सारख्या दिग्गजांना मागे टाकले. कोहलीने 161 डावांमध्ये तर एबी डिव्हिलियर्सने 166 डावांमध्ये ही कामगिरी केली होती.