Manish Jadhav
जो रुटची गणना जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये होते. त्याच्याकडे विकेटवर टिकून राहण्याची अद्भुत क्षमता आहे.
त्याने जगाच्या कानाकोपऱ्यात धावा केल्या असून संघाला विजयही मिळवून दिला आहे.
भारताविरुद्ध त्याची बॅट तळपते. आता त्याने तिसऱ्या कसोटी सामन्यातही शानदार अर्धशतक झळकावले.
रुटने तिसऱ्या कसोटी सामन्यात 45 धावा करुन कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताविरुद्ध 3000 धावा पूर्ण केल्या आहेत.
भारताविरुद्ध कसोटीत अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज बनला. त्याच्या आधी कसोटी क्रिकेटच्या जगात कोणताही दुसरा फलंदाज भारताविरुद्ध इतक्या धावा करु शकला नव्हता. रुटनंतर रिकी पॉन्टिंग दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याने भारतीय संघाविरुद्ध 2555 कसोटी धावा केल्या आहेत.
रुटने 2012 मध्ये भारताविरुद्धच कसोटी पदार्पण केले होते, तेव्हापासून त्याने भारताविरुद्ध 33 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 3009 धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून 10 शतके आणि 13 अर्धशतके झाली आहेत.
भारताविरुद्धच्या गेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये रुटला चांगली कामगिरी करता आली नाही, परंतु आता तो पुन्हा फॉर्ममध्ये आला आहे.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात तो इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत कसोटीत 13169 धावा केल्या आहेत, ज्यात 36 शतके आणि 67 अर्धशतकांचा समावेश आहे.