Pranali Kodre
भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना 2 फेब्रुवारी 2024 रोजी सुरु झाला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी 396 धावांवर संपल्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंड संघाला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सतावले.
बुमराहने इंग्लंडच्या पहिल्या डावात 15.5 षटकात 45 धावा देत 6 विकेट्स घेतल्या. त्यामुळे इंग्लंडचा पहिला डाव 253 धावांत संपुष्टात आला.
दरम्यान, या 6 विकेट्ससह बुमराहने त्याच्या कारकिर्दीत 150 कसोटी विकेट्सचा टप्पाही पूर्ण केला.
बुमराहने 34 व्या सामन्यात खेळताना 150 कसोटी विकेट्स पूर्ण केल्या. त्यामुळे तो भारताकडून सर्वात कमी सामन्यात 150 कसोटी विकेट्स घेणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे.
बुमराहने कपिल देव यांचा विक्रम मोडला आहे. कपील देव यांनी 39 कसोटी सामन्यात 150 विकेट्स घेतल्या आहेत.
सर्वात कमी सामन्यांत 150 कसोटी विकेट्स घेणाऱ्या भारतीय वेगवान गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर जवागल श्रीनाथ असून त्यांनी 39 सामन्यांत हा टप्पा पूर्ण केला होता.
मोहम्मद शमी या विक्रमाच्या यादीत चौथ्या क्रमांकावर असून त्याने 42 सामन्यांत 150 कसोटी विकेट्सचा टप्पा पूर्ण केला होता.
झहीर खान या विक्रमाच्या यादीत पाचव्या क्रमांकावर असून त्याने 49 कसोटी सामन्यांत 150 विकेट्स पूर्ण केल्या होत्या.