Manish Jadhav
जयगड किल्ला राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये 'चील का टीला' (Eagles' Hill) नावाच्या टेकडीवर आहे. हा किल्ला आमेर किल्ल्याच्या अगदी जवळ असून, दोन्ही किल्ले एका बोगद्याने जोडलेले आहेत.
या किल्ल्याचे बांधकाम सवाई जयसिंग दुसरा यांनी 1726 मध्ये केले. हा किल्ला मुख्यतः आमेर किल्ला आणि त्यातील राजघराण्याच्या संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी वापरला गेला. म्हणूनच या किल्ल्याला ‘विजय किल्ला’ असेही म्हणतात.
जयगड किल्ल्याची खास ओळख म्हणजे येथे असलेली जैवना तोफ. ही जगातील असलेली सर्वात मोठी तोफ मानली जाते. 1720 मध्ये जयसिंग दुसरा यांच्या देखरेखीखाली जयगडच्याच तोफखान्यात ती तयार करण्यात आली होती.
हा किल्ला कोणत्याही मोठ्या हल्ल्याचा सामना करण्यासाठी तयार केला गेला होता. त्याच्या मजबूत तटबंदी, भव्य बुरुज आणि प्रवेशद्वारामुळे त्याला कधीही मोठे युद्ध किंवा हल्ल्याचा सामना करावा लागला नाही. म्हणूनच हा किल्ला आजही उत्तम स्थितीत आहे.
जयगड किल्ल्यामध्ये अनेक सुंदर राजवाडे, सभागृह आणि ऐतिहासिक मंदिरे आहेत. त्यापैकी सर्वात प्रसिद्ध म्हणजे लक्ष्मी विलास, ललित मंदिर आणि विलास मंदिर. किल्ल्याच्या आतमध्ये एक मोठे जलसाठा आहे, जो तत्कालीन जल व्यवस्थापनाचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
या किल्ल्याबद्दल एक प्रसिद्ध दंतकथा अशी आहे की, आणीबाणीच्या काळात राजघराण्याचा गुप्त खजिना या किल्ल्यात लपवून ठेवण्यात आला होता.
जयगड आणि आमेर किल्ला हे एका बोगद्याने जोडलेले आहेत. हा बोगदा आणीबाणीच्या परिस्थितीत राजा आणि त्याच्या कुटुंबाला सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी तयार करण्यात आला होता.
जयगड किल्ला जयपूरच्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. इतिहासप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी हे एक आदर्श ठिकाण आहे. इथून जयपूर शहर आणि आमेर किल्ल्याचे सुंदर दृश्य दिसते.