Manish Jadhav
इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्त्रायल सातत्याने गाझावर हवाई हल्ले करत आहे. तर दुसरीकडे, इस्त्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील संघर्षानेही परिसीमा गाठली आहे.
इस्त्रायल आणि हिजबुल्ला दोघेही एकमेकांच्या ठिकाणांना लक्ष्य करत आहेत. यातच आता, इस्रायलने पुन्हा एकदा हिजबुल्लाच्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे.
इस्त्रायली सैन्याने बुधवारी पहाटे सांगितले की, त्यांनी लेबनीज दहशतवादी संघटना हिजबुल्लाला रोखण्यासाठी सीरियामधील त्याच्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे. गाझामध्ये हमासच्या दहशतवाद्यांशी लढत असताना इस्त्रायल हिजबुल्लाला तोंड देण्यासही तयार असल्याचे वारंवार या हल्ल्यांच्या माध्यमातून दर्शवून देत आहे.
इस्रायली लष्कराच्या वतीने सांगण्यात आले की, इस्रायल आपल्या हद्दीत होणाऱ्या सर्व कारवायांसाठी सीरियाच्या राजवटीला जबाबदार धरते. सीरियाच्या सीमेवर हिजबुल्लाची पकड मजबूत होईल अशा कोणत्याही कृतीला इस्त्रायली लष्कर बळ देऊ देणार नाही.
सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्स या ब्रिटनस्थित संघटनेने सांगितले की, इस्रायली विमानांनी सोमवारी आणि मंगळवारी उशिरा सीरियामध्ये हल्ले केले. दक्षिण सीरियातील धायरा भागात शस्त्रास्त्रांचा साठा असलेला डेपो नष्ट करण्यात आला.
याशिवाय, एक लष्करी तळ देखील नष्ट करण्यात आला जो इराण आणि हिजबुल्ला समर्थित दहशतवादी गोलन हाइट्सवरुन रॉकेट सोडण्यासाठी वापरत होते.
गृहयुद्ध सुरु झाल्यापासून इस्रायली सैन्याने सीरियामध्ये शेकडो हल्ले केले आहेत, विशेषत: इराण समर्थक ठिकाणांना लक्ष्य केले आहे.