Manish Jadhav
इस्त्रायल आणि हमास यांच्यात मागील सहा महिन्यांपासून घनघोर युद्ध सुरु आहे. इस्त्रायल सातत्याने गाझावर मिसाइल डागत आहे.
इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध लवकरात लवकर थांबावे अशी मागणी सातत्याने केली जात आहे. युद्ध थांबण्यासाठी इस्त्रायल आणि हमास यांच्यावर आंतरराष्ट्रीय दबावही वाढत आहे.
इस्त्रायल आणि हमास दोघेही या दबावाकडे दुर्लक्ष करुन एकमेकांवर हल्ले करत आहेत. रमजानच्या पवित्र महिन्यात लवकरच इस्त्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम होऊ शकतो अशी शक्यता मागील काही दिवसांपासून वर्तवली जात आहे.
इस्त्राल आणि हमास यांच्यातील युद्धविरामाबाबत भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चला तर मग जाणून घेऊया की, भारताने इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामाबाबत काय भूमिका मांडली आहे.
दरम्यान, रमजान महिन्यात गाझामध्ये युद्धविराम करण्याची मागणी करणाऱ्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावाचे भारताने “सकारात्मक पाऊल” म्हणून वर्णन केले आहे. इस्रायल-हमास संघर्षामुळे निर्माण झालेले मानवतावादी संकट ‘अस्वीकार्य’ असल्याचे भारताने म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी, राजदूत रुचिरा कंबोज यांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीला संबोधित करताना सांगितले की, “गाझामध्ये सुरु असलेल्या संघर्षाबद्दल आम्ही अत्यंत चिंतित आहोत. या प्रदेशात मानवतावादी संकट अधिक गडद होत चालले आहे.''
UN मधील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज पुढे म्हणाल्या की, ''संघर्षावर भारताची भूमिका देशाच्या नेतृत्वाने (पंतप्रधान मोदी) वेळोवेळी स्पष्टपणे व्यक्त केली आहे. दहशतवादी हल्ले किंवा ओलीस ठेवणे हे कोणत्याही प्रकारे समर्थनीय ठरु शकत नाही.''