Sameer Amunekar
प्रत्येक रोपाला उन्हाची गरज सारखी नसते. घरात कोणत्या कोपऱ्यात किती सूर्यप्रकाश येतो, त्यानुसार रोपांची निवड करा. 'लो-लाईट' प्लांट्स (उदा. स्नेक प्लांट, मनी प्लांट) खिडकीपासून दूरही जगू शकतात, तर काहींना उन्हाची गरज असते.
रोपे मरण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे जास्त पाणी देणे. नेहमी कुंडीतील मातीची वरची १-२ इंच थर सुकली आहे का, ते तपासा. जर माती ओलसर असेल, तर पाणी देऊ नका.
नेहमी छिद्रे असलेली कुंडी वापरा. छिद्रे नसतील, तर पाणी साचून राहते आणि मुळे कुजतात. कुंडीत पाणी तुंबू देऊ नका, ते बाहेर जाणे गरजेचे आहे.
इनडोअर प्लांट्ससाठी नेहमी 'वेल-ड्रेन' (पाण्याचा निचरा होणारी) माती वापरा. मातीत कोकोपीट, सेंद्रिय खत आणि थोडी वाळू मिसळल्यास मुळांना हवा खेळती राहते आणि रोपांची वाढ जोमाने होते.
घरातील रोपांच्या पानांवर धूळ साचल्यामुळे त्यांना श्वास घेणे कठीण जाते. ओल्या सुती कापडाने आठवड्यातून एकदा पाने हलक्या हाताने पुसून घ्या, यामुळे रोपे ताजी तवानी दिसतात.
इनडोअर प्लांट्सना खूप खतांची गरज नसते. महिन्यातून एकदा किंवा दोन महिन्यातून एकदा घरगुती कंपोस्ट किंवा लिक्विड फर्टिलायझर देणे पुरेसे असते. खूप जास्त खते दिल्यास रोपांची पाने जळू शकतात.
काही इनडोअर प्लांट्सना आर्द्रतेची गरज असते. जर हवा खूप कोरडी असेल, तर पानांवर अधूनमधून पाण्याचे फवारे मारा. तसेच, रोपे वातानुकूलित मशीनच्या किंवा पंख्याच्या अगदी समोर ठेवणे टाळा, कारण त्यामुळे रोपे लवकर सुकू शकतात.