Manish Jadhav
भारत गेल्या काही वर्षात आर्थिक आघाडीवर वेगना प्रगती करत आहे. 2025 हे वर्ष आर्थिकदृष्ट्या भारतासाठी आतापर्यंत लाभदायी ठरले आहे.
आर्थिक वर्ष 2025 च्या तिसऱ्या तिमाहीत भारताचा आर्थिक विकास दर 6.2% पर्यंत वाढला आहे. दुसऱ्या तिमाहीत हाच दर 5.4% होता. याचा अर्थ देशाची अर्थव्यवस्था मागील तिमाहीच्या तुलनेत सुधारली आहे.
चांगल्या पावसानंतर ग्रामीण भागात वस्तू-सेवांच्या मागणीत वाढ झाली आहे. तसेच, सरकारी खर्चात वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे.
शुक्रवारी (28 फेब्रुवारी) जारी केलेल्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (एनएसओ) आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. तथापि, वार्षिक आधारावर पाहिले तर, विकास दर कमी झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत हा दर 9.5 टक्के होता. 2024-25 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीसाठी रियल जीडीपी वाढीचा दर 5.6% पर्यंत सुधारित करण्यात आला आहे.
ताज्या आकडेवारीनुसार, 2024-25 या आर्थिक वर्षात रियल जीडीपी किंवा स्थिर किमतींवर जीडीपी ₹187.95 लाख कोटीपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, तर 2023-24 या वर्षासाठी जीडीपीचा पहिला सुधारित अंदाज ₹176.51 लाख कोटी होता. त्याचप्रमाणे, 2024-25 मध्ये रियल जीडीपी वाढीचा दर 6.4% राहण्याचा अंदाज आहे.
पहिल्या सुधारित अंदाजानुसार, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये वास्तविक जीडीपी 9.2% ने वाढण्याचा अंदाज आहे, जो आर्थिक वर्ष 2021-22 (कोविडनंतरचे वर्ष) वगळता गेल्या 12 वर्षांतील सर्वाधिक आहे. 'उत्पादन' क्षेत्र (12.3%), 'बांधकाम'क्षेत्र (10.4%) आणि 'वित्तीय, रिअल इस्टेट आणि व्यवसाय सेवा' क्षेत्रातील (10.3%) दुहेरी अंकी वाढीमुळे ही वाढ झाली.