Rahul sadolikar
स्तनी वर्गाच्या समखुरी गणाच्या गोकुलातील एक प्राणी. हिंदी भाषेत याला गौर हे नाव आहे. भारतीय जातीच्या गव्याचे शास्त्रीय नाव बॉस गॉरस असे आहे. थायलंड, मलेशिया, लाओस, व्हिएटनाम, नेपाळ, भूतान आणि भारत या देशांतील दाट वनांत ते आढळतात.
गव्यांची संख्या पाहता ८० % गवे भारतात आढळतात. भारतामध्ये डोंगराळ भागातील अरण्यांत आणि हिमालयाच्या पायथ्याच्या टेकड्यांत गवे आढळतात. महाराष्ट्रातील रत्नागिरी, कोल्हापूर, अमरावती व भंडारा या जिल्ह्यांमधील डोंगराळ प्रदेशात ते आढळून येतात.
. गव्याची शरीरयष्टी भरदार असते. पूर्ण वाढलेल्या नर गव्याची उंची सु.180 सेंमी. व लांबी सु. 300 सेंमी. असते. नराच्या शिंगांचा विस्तार मुळापासून 78-90 सेंमी. असतो. कान आकाराने मोठे असतात. नर गव्याचे वजन 900-1,000 किग्रॅ. पर्य़ंत भरते.
गव्याचे नुकतेच जन्मलेले पिलू सोनेरी पिवळ्या रंगाचे असते. नंतर ते हळूहळू तांबूस रंगाचे होऊन शेवटी लालसर तांबड्या रंगाचे अथवा कॉफीच्या रंगाचे होते. पूर्ण वाढ झाल्यानंतर गव्याच्या शरीराचा रंग काळा होतो. कपाळ राखाडी रंगाचे असते. गव्याचे पाय बळकट असून त्याचा खालचा भाग गुडघ्यापर्यंत पांढरा असल्यामुळे हा भाग पायमोजे घातल्यासारखा दिसतो.
गव्यांची शिंगे गायी-म्हशींच्या शिंगांसारखीच असतात. शिंगे जन्मभर कायम असतात. गवे वेगवेगळ्या परिस्थितीत फिसकारणे, भ्याँऽऽ करून ओरडणे, रेकणे, हंबरणे व शिळ घालणे असे वेगवेगळे आवाज काढतात.
गवे उन्हाच्या वेळी एकांतस्थळी सावलीमध्ये रवंथ करीत पडून राहतात. गवे क्षारयुक्त जमीन असलेल्या ठिकाणी अधूनमधून जाऊन ती चाटतात. यांमुळे त्यांना सोडियम, पोटॅशियम, लोह, फॉस्फरसयुक्त व क्षारांचा पुरवठा होऊन त्यांची हाडे व स्नायू बळकट होतात.
गव्याचे सामान्यतः 10-12 जणांचे लहान कळप असतात. त्यांचा प्रजननाचा काळ ठराविक असा दिसून येत नाही. नर-मादी डिसेंबर-जानेवारीच्या सुमारास माजावर येतात. गर्भावधी नऊ महिन्यांचा असतो. प्रजननाचा काळ निरनिराळ्या प्रदेशांत पुढेमागे असतो. गव्याचा आयुःकाल 30-40 वर्षे असतो. .