गोमन्तक डिजिटल टीम
आज भारतीय वायुसेनेचा दिवस. का? कारण 1932 मध्ये 8 ऑक्टोबर रोजी भारतीय वायुसेनेची स्थापना झाली होती.
भारतीय थलसेना, जलसेना आणि वायुसेना यांमुळे आपण देशात सुरक्षितपणे वावरतो हे कोणीही नाकारू शकत नाही आणि आज भारतीय वायुसेनेच्या स्थापना दिनाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
आज भारतीय वायुसेनेकडून रविवारी एक एअरशो आयोजित करण्यात आलाय. चेन्नईच्या मरीना बीचवर सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत हा सोहळा असेल.
या कार्यक्रमात फ्लायपास्ट असेल, ज्यामध्ये विविध श्रेणीतील 64 विमाने दाखवली जातील जी भारतीय वायुसेनेच्या शौर्याचे आणि शक्तीचे प्रदर्शन करतील.
भारतीय वायुसेनेने आजपर्यंत अनेक महत्वाच्या कामगिऱ्या बजावल्या आहेत, यात पाकिस्तानबरोबर तब्बल चारवेळा दोनहात करण्यात आलेत. या चार लढायांमध्ये कारगिल आणि बांगलादेशच्या लढाईचा समावेश आहे.
वर्ष 1961 मध्ये गोव्याला पुन्हा भारतात सामील करण्यासाठी देखील भारतीय वायुसेनेने मोठी मदत केली होती.
चीन सारख्या बलाढ्य शत्रूला परत फिरवण्यात भारतीय वायुसेना कायमच सक्षम असते, त्यामुळे आजच्या या दिवशी भारतीय वायुसेनेच्या पराक्रमाला आणि शौर्याला वंदन.