Manish Jadhav
देशात तंत्रज्ञान क्षेत्राचा झपाट्याने विकास होत आहे. गेल्या काही वर्षात या क्षेत्रात मोठ्याप्रमाणात नोकऱ्या निर्माण झाल्या.
2024-25 या आर्थिक वर्षात तंत्रज्ञान उद्योगातील कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट होऊन 1.25 लाख नवीन नोकऱ्या निर्माण होतील, असे नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज (NASSCOM) च्या अहवालात सांगण्यात आले आहे. गेल्या आर्थिक वर्षात हे प्रमाण 60,000 होते.
अमेरिका आणि युरोपमधील आयटी उद्योग गेल्या काही वर्षापासून मोठ्या मंदीचा सामना करत आहे. याच पार्श्वभूमीवर नुकताच प्रसिद्ध झालेला हा अहवाल भारतीयांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.
NASSCOM च्या अहवालानुसार, याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वाढता वापर असल्याचे सांगण्यात आले आहे, ज्यामध्ये पहिले नाव येते ते एजंटिक एआयचे. एजंटिक एआय स्वतःहून निर्णय घेऊ शकते. तो स्वतःचे काम स्वतः करु शकतो. यामुळे, व्यवसाय मॉडेलमध्ये बदल झपाट्याने बदल होईल.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अवलंब केल्याने व्यवसाय मॉडेलमध्ये वेगाने बदल होत आहेत. कंपन्यांच्या कामगिरीतही कमालीची सुधारणा पाहायला मिळत आहे. याशिवाय, तंत्रज्ञानाच्या वाढीमध्ये ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्सही (GCC) महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
तंत्रज्ञान उद्योगात कर्मचाऱ्यांचे कौशल्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षेचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरुन ते काळानुरुप काम करु शकतील.
भारत सरकार आणि खाजगी कंपन्या एकत्रितपणे तरुणांना एआयमध्ये तयार करण्यावर भर देत आहेत. डिजिटल सुरक्षितता आणि नवीन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करुन, भारताचे तंत्रज्ञान क्षेत्र 2026 पर्यंत 300 अब्ज डॉलर्सचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रवासाच्या दिशेने वाटचाल करत आहे.