Manish Jadhav
भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील शेवटचा म्हणजेच तिसरा एकदिवसीय सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे.
भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिलने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शानदार शतक झळकावले. गिलने फक्त 95 चेंडूत त्याचे 7 वे एकदिवसीय शतक पूर्ण केले. त्याने 14 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. यासह, त्याने इंग्लंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत सलग तिसऱ्यांदा 50+ धावा करण्याचा पराक्रम केला.
नागपूरमध्ये इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात गिल शतकापासून फक्त 13 धावांनी दूर राहिला होता. यानंतर, कटकमध्ये त्याच्या बॅटमधून 60 धावांची खेळी आली होती. त्याने मालिकेतील सलग तिसऱ्या सामन्यात शतक झळकावून एक मोठा विक्रम रचला.
3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील प्रत्येक सामन्यात 50+ धावा करणारा गिल 7वा भारतीय फलंदाज ठरला आहे. गिलच्या आधी क्रिस श्रीकांत, दिलीप वेंगसरकर, मोहम्मद अझरुद्दीन, एमएस धोनी, श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांनी एकदिवसीय सामन्यात ही मोठी कामगिरी केली होती.
या शतकी खेळीदरम्यान शुभमन गिलने एक मोठा विश्वविक्रमही मोडला. भारतासाठी 50 वा एकदिवसीय सामना खेळताना गिलने 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये 2500 धावा पूर्ण केल्या. यासह, गिलने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद 2500 धावा करण्याचा विश्वविक्रम मोडला. यापूर्वी, हा विश्वविक्रम हाशिम अमलाच्या नावावर होता.