Manish Jadhav
टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील 5 वा आणि शेवटचा सामना खेळत आहे. या सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व जसप्रीत बुमराहच्या हाती आहे.
या सामन्यात बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. सिडनी कसोटीतही भारतीय फलंदाजांना लय गवसली नाही.
ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज स्कॉट बोलंडच्या समोर भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्करली. या सामन्यात बोलंडने शानदार गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंतचा तो सर्वात यशस्वी खेळाडू ठरला.
स्कॉट बोलंडने भारताविरुद्ध चार विकेट घेताच त्याच्या कसोटी कारकिर्दीतील एकूण 50 बळी पूर्ण केले. गेल्या 50 वर्षात 50 कसोटी विकेट्स पूर्ण करणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. बोलंड सध्या 35 वर्षांचा आहे.
पदार्पणापासूनच तो अप्रतिम कामगिरी करत आहे. नितीश कुमार रेड्डी बोलंडचा 50 वा कसोटी बळी ठरला. त्याने रेड्डीला शून्यावर बाद केले. याशिवाय, त्याने या सामन्यात यशस्वी जैस्वाल, विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना बाद केले.
बोलंड हा त्याच्या वाढत्या वयाबरोबर अधिक धोकादायक गोलंदाज बनत चालला आहे. सध्या सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याने आतापर्यंत 15 विकेट्स घेतल्या आहेत.
आपल्या छोट्याशा कारकिर्दीत त्याने विराट कोहली आणि जो रुट सारख्या बड्या फलंदाजांना 4 वेळा आपला शिकार बनवले. अशा परिस्थितीत त्याला हलक्यात घेणे हे कोणत्याही संघासाठी मोठे धोक्याचे ठरेल.