Akshata Chhatre
गेली काही वर्षे इफ्फीच्या काळात गोव्यातील ‘वॉटर कलर आर्टिस्ट असोसिएशन ऑफ गोवा’ या संस्थेने भरवलेले जलरंगातील चित्रांचे प्रदर्शन आपल्याला गोवा मनोरंजन संस्थेच्या चित्रदालनात पहायला मिळते.
यंदाही या संस्थेच्या १७ सदस्यांनी रंगवलेल्या चित्रांचे प्रदर्शन, ‘स्प्लॅश’ हे त्या ठिकाणी भरले आहे.
एकूण ४२ आकर्षक चित्रे या दालनात मांडली गेली आहेत. गोव्यातील ज्येष्ठ चित्रकारांबरोबर नवोदित जलरंग चित्रकारांची चित्रेही या प्रदर्शनात आपल्याला पाहायला मिळतात.
जलरंगातील चित्र प्रदर्शन, तसेच चित्रकारांना चित्र रंगवताना पाहणे हा एक मनोरम पायंडा गेल्या काही वर्षांपासून इफ्फीत पडलेला आहे.
एखादे चित्र कागदावर साकार होताना पाहणे हा देखील सिनेमा पाहण्याइतकाच आनंददायी अनुभव असतो.
चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन २१ नोव्हेंबर रोजी झाले यावेळी डिलाईला लोबो देखील उपस्थित होत्या.
हे प्रदर्शन २८ नोव्हेंबरपर्यंत सर्वांसाठी खुले आहे.