Manish Jadhav
31 डिसेंबरच्या पार्टीनंतर येणारा हँगओव्हर (Hangover) नवीन वर्षाच्या सुरुवातीचा उत्साह कमी करु शकतो. हा हँगओव्हर उतरवण्यासाठी आणि ताजेतवाने होण्यासाठी खालील 8 सोपे उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील.
अल्कोहोलमुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होते, ज्यामुळे डोकेदुखी वाढते. सकाळी उठल्यावर कोमट पाणी किंवा भरपूर साधे पाणी प्यावे, जेणेकरुन शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होईल.
लिंबू पाणी व्हिटॅमिन सी देते आणि यकृताला स्वच्छ करण्यास मदत करते. तसेच, नारळ पाणी किंवा इलेक्ट्रॉल पावडर घेतल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी आणि क्षार संतुलित होतात.
हँगओव्हरमध्ये शरीरातील पोटॅशियमची पातळी कमी होते. केळी खाल्ल्याने झटपट ऊर्जा मिळते आणि स्नायूंचा अशक्तपणा दूर होतो.
आल्यामध्ये मळमळ रोखण्याचे गुणधर्म असतात. आल्याचा चहा किंवा आल्याचा तुकडा चघळल्याने पोटातील अस्वस्थता कमी होते आणि मधातील फ्रुक्टोज अल्कोहोल लवकर पचवण्यास मदत करते.
रिकाम्या पोटी ॲसिडिटी वाढू शकते. टोस्ट, ओट्स किंवा फळे असा हलका नाश्ता करा. जास्त तेलकट किंवा तिखट पदार्थ खाणे टाळा, कारण त्यामुळे पोटाचा त्रास वाढू शकतो.
कोमट पाण्याने अंघोळ केल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायूंना आराम मिळतो. यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल आणि हँगओव्हरची सुस्ती दूर होईल.
हँगओव्हर घालवण्यासाठी झोप हा उत्तम उपाय आहे. पुरेशी झोप घेतल्याने मेंदूला आराम मिळतो आणि शरीराची रिकव्हरी वेगाने होते.
अनेकांना वाटते की कडक कॉफीने हँगओव्हर जातो, पण जास्त कॅफिनमुळे डिहायड्रेशन वाढू शकते. त्याऐवजी हर्बल टी किंवा ताक घेणे अधिक फायदेशीर ठरेल.