Manish Jadhav
मीठ हा आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा घटक आहे, परंतु त्याचे प्रमाण जास्त झाल्यास ते शरीरासाठी हानिकारक ठरु शकते. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) शिफारशीनुसार, एका प्रौढ व्यक्तीने दररोज 5 ग्रॅम (सुमारे 1 चमचा) मीठच सेवन करावे. यापेक्षा जास्त मीठ घेतल्यास अनेक गंभीर आरोग्य समस्यांचा धोका निर्माण होतो.
मीठामधील सोडियममुळे शरीरात पाणी धरुन ठेवले जाते, ज्यामुळे रक्तदाब वाढतो. उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार, स्ट्रोक आणि मूत्रपिंडाच्या समस्यांचा धोका वाढतो.
जास्त मीठ सेवन केल्याने हृदयावर ताण येतो, रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. सतत जास्त मीठ खाल्ल्यास हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता दुपटीने वाढते.
अधिक मीठ खाल्ल्याने मूत्रपिंडांवर ताण येतो आणि ते योग्य प्रकारे कार्य करु शकत नाहीत. परिणामी, मूत्रपिंडाचे कार्य मंदावते आणि किडनी स्टोन तसेच मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढतो.
मीठ जास्त प्रमाणात घेतल्याने हाडांमधून कॅल्शियम बाहेर पडते, ज्यामुळे हाडे ठिसूळ होतात आणि ऑस्टिओपोरोसिस (हाडांचे विकार) होण्याची शक्यता वाढते.
अतिरिक्त मीठ खाल्ल्यास पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. यामुळे पोट फुगणे, गॅस होणे आणि अॅसिडिटी होण्याची शक्यता वाढते. तसेच, जास्त मीठ सेवन केल्यास पोटाच्या अल्सरचा धोका वाढतो.
जास्त सोडियममुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो. उच्च रक्तदाबामुळे मेंदूतील रक्तप्रवाह कमी होऊ शकतो आणि स्मृतिभ्रंश (Dementia) किंवा अल्झायमरचा धोका वाढतो.