Akshata Chhatre
मित्रमैत्रिणींचा ग्रुप असो किंवा ऑफिसमधल्या सहकाऱ्यांच्या गप्पा. कंटाळा आला की ‘चलो गोवा’ असं सहज म्हणतो.
गोव्याला दरवर्षी 1 कोटीहून अधिक पर्यटक येतात. पण गोव्यात या पर्यटनाची सुरूवात कधीपासून झाली हे तुम्हाला माहितीये का?
साधारण 1960-70 च्या व्हिएतनाम युद्ध सुरू होतं आणि भौतिकवादाच्या विरोधात असणाऱ्या तरुणांचा एक समूह उदयास आला. यालाच हिप्पी असं म्हणतात.
1960 दशकात हे ‘हिप्पी’ हिवाळ्यात गोव्यात पोहोचले आणि तिथून पर्यटनाला सुरुवात झाली, असं म्हणतात.
उत्तर गोव्यातील हणजूण आणि हरमल अशा समुद्र किनारी स्थानिकांना पहिल्यांदा काही पर्यटक दिसले, असा उल्लेख आढळतो.
संपत्ती आणि भांडवलशाही विरोध दर्शवणाऱ्या या हिप्पींना गोव्यातील शांतता, निसर्ग आणि संस्कृती भावली. स्थानिकांनी बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना रहायला जागा दिली, स्थानिक जेवण दिलं आणि गोव्याचा निसर्ग दाखवला.
त्या काळात गोव्यातील सरकारकडून पर्यटनवाढीसाठी विशेष निधीचा अभाव होता. पण तरीही स्थानिकांनी व्यावसायिक वृत्तीचे दर्शन जगाला घडवले.