Akshata Chhatre
शिवाजी महाराजांना स्वराज्यासाठी मजबूत आरमाराची गरज होती. कारण समुद्रातून सिद्दी आणि इतर शत्रू स्वराज्यावर आक्रमण करत होते. पण आरमार उभं करायचं म्हणजे जहाजं बनवायची आणि त्यासाठी लागणार होते कुशल कारागीर.
वसई भागात पोर्तुगीजांचे जहाजं बांधण्यात माहीर असलेले कारागीर राहत होते. रुइ लैतांव व्हिएगश आणि आणि त्याचा भाऊ फेर्नाव लैतांव व्हिएगश हे त्यापैकीच दोन कुशल कारागीर होते. शिवाजी महाराजांनी या दोघांच्या मदतीने आपली पहिली २० लढाऊ जहाजं बांधली.
या जहाजांच्या निर्मितीसाठी सुमारे ३४० कामगार होते, ज्यात पोर्तुगीज आणि इतर कारागिरांचा सहभाग होता. हे सगळे रुइ लैतांव व्हिएगश याच्या देखरेखीखाली काम करत होते. त्यांच्या कुटुंबांना धरून, एकूण ४०० लोक या कामात गुंतलेले होते.
शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की, ही जहाजं जंजिऱ्याच्या सिद्दीचा धोका लक्षात घेऊन बांधली जात आहेत. पण खरं कारण स्वराज्याचं आरमार मजबूत करणं होतं. पोर्तुगीज व्हाइसरॉयला कळलं की, आपले लोक शिवाजी महाराजांसाठी काम करत आहेत.
त्यांनी १७ मे १६६८ रोजी एक आदेश काढून पोर्तुगीज नागरिकांना शिवाजी महाराजांच्या सैन्यातून परत बोलावले. कारण त्यांना वाटलं की, हे लोकं सिद्दी आणि पोर्तुगीज दोघांसाठीही त्रासदायक ठरतील.
या आदेशामुळे, शिवाजी महाराजांच्या सैन्यात काम करणारे सर्व पोर्तुगीज लोकं अचानक काम सोडून मुंबई आणि वसईला पळून गेले.
तरीही, शिवाजी महाराजांनी आपल्या कुशलतेने आरमार उभारलं आणि स्वराज्याचं रक्षण केलं.
(संदर्भ: पोर्तुगीज-मराठे संबंध)