Sameer Amunekar
पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे खाडी जिथे समुद्राला मिळते, त्या खाडीच्या मुखावर तारापूरचा किल्ला बांधलेला आहे.
बाराव्या शतकापासून तारापूर किल्ल्याचा उल्लेख आढळतो. इसवीसन १२८० मध्ये माहीमचा राजा भीम याने नाईकांकडून या किल्ल्याचा ताबा मिळवला.
पुढील काळात या किल्ल्यावर पोर्तुगीज, पेशवे व मराठे अशा विविध सत्तांचा अंमल राहिला.
पोर्तुगीजांनी तारापूर किल्ला जिंकून घेतला व इसवीसन १५९३ मध्ये त्याची पुनर्बांधणी केली.
पोर्तुगीजांच्या आगळिकीमुळे संभाजीराजांनी दीव, दमण, सायवन, अशेरीगडासह तारापूरवर हल्ला केला. गाव बेचिराख झाले, मात्र किल्ला जिंकण्यासाठी पुरेसा वेळ नसल्याने तो सुरक्षित राहिला.
२४ डिसेंबर १७३८ रोजी चिमाजी आप्पांनी जातीने हल्ला करून तारापूर किल्ला जिंकून घेतला.
सध्या तारापूरमधील श्री. चोरगे यांच्या ताब्यात हा किल्ला असून त्यांनी किल्ल्याच्या परिसरात चिकू, आंबा, नारळ व सुपारीच्या बागा फुलवल्या आहेत.