Manish Jadhav
प्रबळगड किल्ल्याला पूर्वी 'मुरंजन' या नावाने ओळखले जाई. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656-57 च्या सुमारास कल्याण-भिवंडी स्वारीच्या वेळी हा किल्ला आदिलशाही/मोगलांकडून जिंकून घेतला आणि त्याचे नाव 'प्रबळगड' असे ठेवले.
निजामशाहीच्या अस्ताच्या वेळी (1636) मोगल आणि आदिलशाही फौजांपासून संरक्षण मिळवण्यासाठी शहाजीराजे, जिजाऊ आऊसाहेब आणि बाल शिवबांनी काही काळ या किल्ल्यावर आश्रय घेतला होता.
महाराजांनी जेव्हा या गडावर हल्ला केला, तेव्हा मोगल किल्लेदार केशरसिंह हाडा याने निकराचा लढा दिला. या युद्धात केशरसिंह धारातीर्थी पडला आणि राजपूत स्त्रियांनी गडावर 'जोहार' केला.
केशरसिंहाच्या मृत्यूनंतर त्याची आई आणि मुले गडावर सापडले. महाराजांनी शत्रू असूनही त्यांना कोणत्याही प्रकारची इजा न करता, सन्मानाने आणि सुरक्षितपणे त्यांच्या गावी पोहोचवण्याची व्यवस्था केली. हे महाराजांच्या स्त्री-दाक्षिण्याचे आणि मानवतेचे उत्तम उहारण आहे.
मिर्झाराजे जयसिंगासोबत झालेल्या तहानुसार महाराजांना मोगलांना जे 23 किल्ले द्यावे लागले, त्यामध्ये प्रबळगडाचा समावेश होता.
पुरंदरचा तह मोडल्यानंतर, 1670 च्या सुमारास मराठ्यांनी पुन्हा हल्ला करुन हा बलवान किल्ला स्वराज्यात सामील करुन घेतला.
प्रबळगड हा माथेरानच्या डोंगररांगेत असून तो अतिशय दुर्गम आहे. उत्तर कोकणातील कल्याण आणि पनवेल या व्यापारी मार्गांवर आणि बंदरांवर नजर ठेवण्यासाठी हा किल्ला मोक्याचा होता.
प्रबळगडाच्या शेजारीच 'कलावंतीण दुर्ग' हा एक सुळका आहे. शिवकाळात प्रबळगडाचा उपदुर्ग किंवा टेहळणी बुरुज म्हणून याचा वापर केला जात असे.