Manish Jadhav
ग्वाल्हेरचा किल्ला हा भारतातील सर्वात मजबूत आणि भव्य किल्ल्यांपैकी एक आहे. या किल्ल्याची अभेद्य रचना आणि भौगोलिक महत्त्व पाहून मुघल सम्राट बाबराने याला "हिंदुस्तानातील किल्ल्यांच्या मुकुटातील मणी" असे संबोधले होते.
या किल्ल्याची निर्मिती आठव्या शतकात (सुमारे सन 727) 'सूरज सेन' नावाच्या स्थानिक राजाने केली असे मानले जाते. 'ग्वालिपा' नावाच्या साधूने राजा सूरज सेन याला एका प्राणघातक आजारातून बरे केले होते, त्यांच्याच स्मरणार्थ या किल्ल्याला 'ग्वाल्हेर' हे नाव मिळाले.
15व्या शतकात तोमर घराण्यातील प्रसिद्ध राजा मानसिंग तोमर यांच्या काळात किल्ल्याचा सुवर्णकाळ मानला जातो. त्यांनी किल्ल्याच्या आत अप्रतिम वास्तुशिल्प असलेला 'मान मंदिर महल' उभारला. हा महाल त्याच्या रंगीबेरंगी टाईल्स आणि अद्वितीय नक्षीकामासाठी प्रसिद्ध आहे.
1857 च्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यात ग्वाल्हेरच्या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. इंग्रजांविरुद्ध लढा देताना वीरंगना राणी लक्ष्मीबाई यांनी याच किल्ल्याच्या परिसरात आपले अंतिम आणि अभूतपूर्व शौर्य गाजवले होते. किल्ल्याजवळच राणी लक्ष्मीबाईंचे स्मारक आहे.
मुघल काळात या किल्ल्याचा वापर मुख्यत्वे राजकीय कैद्यांना ठेवण्यासाठी आणि शाही तुरुंग म्हणून केला जात असे. मुघल सम्राट औरंगजेबाने त्याचा भाऊ मुराद आणि दारा शिकोहचा मुलगा सुलेमान शिकोह या दोघांना याच किल्ल्यात कैद करुन हत्या केली.
शिखांचे सहावे गुरु गुरु हरगोविंद जी यांना मुघल सम्राट जहांगीरने या किल्ल्यात बंदी बनवून ठेवले होते. जेव्हा गुरुंची सुटका झाली, तेव्हा त्यांनी आपल्यासोबत तेथे कैद असलेल्या 52 हिंदू राजांचीही सुटका केली. त्यामुळेच शिख धर्मात या किल्ल्याला विशेष पवित्र स्थान आहे.
या किल्ल्याच्या चढणीवर एका प्राचीन छोट्या मंदिरात जगातील सर्वात जुना 'शून्य'चा लिखित पुरावा कोरलेला आढळतो. याशिवाय किल्ल्यात तेली का मंदिर आणि जैन तीर्थंकरांच्या खडकांत कोरलेल्या महाकाय मूर्ती स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना आहेत.