Manish Jadhav
गोवळकोंडा किल्लाचा इतिहास 13व्या शतकापासून सुरु होतो. सुरुवातीला हा किल्ला काकतीय राजवंशाने (Kakatiya Dynasty) एका टेकडीवर केवळ मातीचा किल्ला म्हणून बांधला होता. नंतरच्या काळात याचे रुपांतर एका अभेद्य दगडी किल्ल्यात झाले.
16व्या शतकात कुतुबशाही राजवंशाच्या काळात गोवळकोंडा किल्ल्याला खऱ्या अर्थाने वैभव प्राप्त झाले. कुतुबशाही सुलतानांनी या किल्ल्याचा विस्तार केला आणि त्याला आपली मुख्य राजधानी बनवले.
गोवळकोंडा हा केवळ एक किल्ला नव्हता, तर ती जगातील सर्वात मोठी हिऱ्यांची बाजारपेठ होती. कोहिनूर, होप डायमंड आणि दर्या-ए-नूर यांसारखे जगातील सर्वात मौल्यवान आणि प्रसिद्ध हिरे याच गोलकोंडाच्या खाणींमधून आले होते.
या किल्ल्याचे वास्तुशिल्प आणि ध्वनीशास्त्र अत्यंत थक्क करणारे आहे. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी हाताने वाजवलेली टाळी तब्बल 1 किलोमीटर दूर असलेल्या किल्ल्याच्या सर्वात उंचावरील भाग म्हणजेच 'बाला हिसार' येथे स्पष्टपणे ऐकू येते.
गोवळकोंडा किल्ला त्याच्या अभेद्य सुरक्षेसाठी ओळखला जातो. या किल्ल्याला एकूण 8 मोठे दरवाजे आणि 7 किलोमीटर लांबीची मजबूत दगडी तटबंदी आहे. शत्रूचे हत्ती दरवाजा तोडू नयेत म्हणून दरवाजांवर लोखंडी अणकुचीदार खिळे बसवण्यात आले होते.
त्या काळातही किल्ल्यावर पाण्याची टंचाई भासू नये म्हणून कुतुबशाही इंजिनिअर्सनी एक प्रगत जल व्यवस्थापन प्रणाली विकसित केली होती. खालून पाणी उंचावरील महालांपर्यंत पोहोचवण्यासाठी चक्रांची आणि मातीच्या पाईप्सची अनोखी रचना करण्यात आली होती.
मुघल सम्राट औरंगजेबाने हा किल्ला जिंकण्यासाठी तब्बल 8 महिने वेढा घातला होता, परंतु त्याला यश येत नव्हते. शेवटी 1687 मध्ये एका फितुराने किल्ल्याचा गुप्त दरवाजा उघडल्यामुळे मुघल सैन्याला आत प्रवेश मिळाला आणि गोवळकोंडा किल्ल्यावरील कुतुबशाहीचे वैभव संपुष्टात आले.