गोमन्तक डिजिटल टीम
गोव्याचं मोहिनी घालणारं निसर्ग सौंदर्य प्रत्येकाला खुणावतं.
हिरवीगार भातशेती, वाऱ्यावर डुलणारे माड, पाणवठे, सीमेवर वाहणारी नदी, सुपीक खाजण जमीन, सभोवार डोंगर आणि टेकड्या अशी नयनरम्य संपन्नता लाभलेली गावे गोव्यात अवघीच असतील.
दक्षिण गोव्यातील कुडतरी हे त्यातील एक भाग्यवान गाव आहे. या गावाला सासष्टी तालुक्याचे धान्याचे कोठार म्हणून ओळखले जाते.
मडगावपासून गाडीने पंधरा मिनिटांच्या अंतरावर हे गाव वसलेले आहे. तेथील सेंटर ॲलक्स चर्च हे गोव्यातील सर्वात जुन्या चर्चपैकी एक आहे. 1597 साली बांधलेले या चर्चचे नूतनीकरण 1647 यावर्षी झाले.
पावसाळ्यात तेथील हिरव्यागार भातशेतीचा देखावा अतिशय सुंदर असतो. या गावाचे सुमारे 6.1 लाख चौरस मीटरच्या क्षेत्राला (तिथल्या तलावांसह) गोव्यातील दुसरे सर्वात मोठे जैवविविधता वारसा स्थळ म्हणून मान्यता लाभलेली आहे.
कुडतरी गावाचे सर्वात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे तेथील जलसाठे- या गावात 5 मोठे आणि 16 लहान तलाव आहेत. राय, आंगडी, मायत़ोळे, सानबे, गुड, कोलाम्ब अशी यापैकी काही तळ्यांची वैशिष्ट्यपूर्ण नावे आहेत.
आजच्या धकाधकीच्या काळातही प्रसन्नता आणि शांततेसह बागडणारे हे गाव एखाद्या चित्रासारखेच आहे.