Ganeshprasad Gogate
तेरेखोल हे खरं तर नदीचं नाव. ही नदी म्हणजे गोवा राज्याची उत्तर सीमा, किल्लाही गोव्यातच आहे. पण किल्ल्यात जाण्याचा मार्ग मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जातो.
फेरीबोटीनं तेरेखोल किल्ल्याकडं जाता येतं. या किल्ल्यावरच्या दोन बुरुजांमधून तेरेखोल नदी आणि सागराचा संगम, पल्याडचा केरीचा समुद्रकिनारा, केरी गाव, हरमल असा नयनमनोहर नजारा दिसतो.
तेरेखोल किल्ल्याची बांधणी अठराव्या शतकाच्या सुरुवातीला मराठ्यांनी केली, असं इतिहास सांगतो. 1746 मध्ये तो पोर्तुगीजांनी घेतला. गोव्याला स्वातंत्र्य मिळेपर्यंत तो पोतुगीजांच्या ताब्यात होता.
या किल्ल्याचे बुरूज महाराष्ट्रातल्या किल्ल्यांपेक्षा वेगळे भासतात. खास पोर्तुगीज वास्तुकलेचा डौल या बुरुजांमधून जाणवतो.
गोवा मुक्ती संग्रामावेळी स्वातंत्र्यसैनिकांची हत्या पोतुगीज सैनिकांनी याच ठिकाणी घडवून आणली होती.
किल्ल्याच्या माथ्यावरून गोव्याच्या निसर्गसमुद्ध किनाऱ्याचं नितांतसुंदर दर्शन घडतं. नदी पार करून किनाऱ्यावर जाणाऱ्या बार्जेसआणि शिडाच्या होड्या बघताना आनंद मिळतो.