गोमन्तक डिजिटल टीम
आता ऊन पावसाचा लपंडाव सुरू झालेला आहे त्यामुळे गोव्यातील खुल्या झालेल्या वैशिष्ट्याची आपण माहिती घेऊ.
गोव्याचा बहुतांश भूभाग हा सडे पठार म्हणता येईल असा आहे. जांभ्या दगडाचे जाळीदार कडक आवरण, लाल माती हे या भूभागाचे वैशिष्ट्य.
काळेकभिन्न दिसणारे विस्तीर्ण सडे पावसाळ्यात हिरवी दुलई घेऊन सजतात. जणू एखादी नवविवाहिता तळव्यावर मेहंदी सजवते तसेच रूप धरणीचे पाहायला मिळते.
जून ते डिसेंबरपर्यंत हजारो फुलांच्या प्रजाती या सड्यावर जन्माला येतात. सड्यावर डबक्यात, खोबणात, गवतात वेगवेगळे जीवजंतू पाहायला मिळतात.
नत्र कमी असल्यामुळे इथल्या बऱ्याचशा वनस्पती परजीवी असतात, काही कीटकभक्षी असतात. या साऱ्यांचे आयुष्य औट घटकेचे असते.
कोकणात अजूनही या सड्यांवर शेती केली जाते. त्यामुळे टिकून राहणारे पुष्पवैभव अजून तरी पाहायला मिळते आहे.
हा अपूर्व सोहळा प्रत्येकाने अनुभवायला हवा. या सड्यांचे महत्व आणि सौंदर्य जाणून घेऊन ते टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.