Manish Jadhav
गोव्यात सध्या जत्रोत्सवाचा हंगाम सुरु आहे. गावागावात जत्रेचा माहोल पाहायला मिळत आहे. आज आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून बोडगेश्वराच्या जत्रेबद्दल जाणून घेणार आहोत.
गोव्यात बोडगेश्वराची जत्रा खूप प्रसिद्ध आहे. गोमंतकियांचे श्रद्धास्थान म्हणजे म्हापशातील प्रसिद्ध श्री देव बोडगेश्वर. डिसेंबर महिना संपत आला, की बोडगेश्वराच्या जत्रेचे प्रत्येकाला वेध लागतात.
भक्तांच्या हाकेला धावणारा देव अशी बोडगेश्वराची ख्याती आहे. प्रत्येक रविवारी आणि बुधवारी अनेक भक्त श्री देव बोडगेश्वराच्या मंदिरात जातात. तिथे आपल्या समस्या गाऱ्हाण्यांद्वारे देवाकडे मांडतात आणि काम व्हावे म्हणून देवाला नवसही बोलतात.
बोडगेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर चारही बाजूने उघडे आहे. मंदिराच्या मध्यभागी बोडगेश्वराची हातात काठी, डोक्यावर फेटा असलेली आकर्षक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते.
पाच दिवसांच्या या जत्रेला गोव्यातील कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी पोहोचले आहेत. बोडगेश्वराला अंगवणीचा देव असेही मानले जाते.
बोडगेश्वराच्या मंदिराला केलेली ही विद्युत रोषणाई भक्तांच्या मनाला आकर्षून जाते. जत्रेचा माहोलच भक्तांच्या मनाला प्रसन्न करुन जातो.